राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यानंतर पार्थ यांनी आज एकविरा देवीचे दर्शन घेतले. ते सध्या मावळ परिसरात स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून एक प्रकारे प्रचार सुरू केला आहे.
मध्यंतरी शरद पवार यांनी पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत असे म्हटल्यानंतर पार्थ पवार यांच्या गाठीभेटी थंडावल्या होत्या. परंतु आता पुन्हा ते सक्रिय झाले आहेत. बुधवारी कार्ला येथील एकविरा देवीचा आशीर्वाद घेतला व निवडणुकीत यशासाठी साकडं घातलं.
अद्याप पार्थ पवार काहीही बोललेले नाहीत. त्यांना प्रतिक्रिया विचारली असता बोलण्यास नकार दिला. अजित पवार यांच्या पुत्रासाठी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले.
शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर दुसरे नातू रोहित पवार यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा असे आवाहन आजोबांना केले. शरद पवार यांच्या माघार घेण्यावरुन त्यांच्यावर टीकेचा भडिमार करणाऱ्यांनाही रोहित यांनी सुनावले आहे. शरद पवारांबद्दल वक्तव्ये करताना त्यांच्याबाबतचे मत शेवटचे असू द्या अन्यथा तुमची बेडकासारखी अवस्था होईल असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला.