पुणे : विकसित राष्ट्र होण्यासाठी देश वाटचाल करत असताना माजी सैनिकांना राष्ट्रनिर्मितीसाठी विविध क्षेत्रांंमध्ये सहभागी करून घेणे शक्य असल्याचे मत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मांडले. माजी सैनिक योगदान देऊ शकतील, अशा संधींच्या विस्ताराचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात स्वत: सैन्यात काम केलेल्या काही राज्यपालांनी या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. तसेच लष्कराच्या सर्व मुख्यालयांच्या प्रमुखांना याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी सैनिकांनी बदलाचे आधारस्तंभ आणि देशाच्या परिवर्तनाचे राजदूत म्हणून काम करण्याची भूमिका कायम ठेवण्याचे आवाहनही लष्करप्रमुखांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लष्करातर्फे नवव्या माजी सैनिक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जनरल द्विवेदी बोलत होते. विकसित राष्ट्र होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद करून लष्करप्रमुख म्हणाले, ‘समाजाची एकत्रित ताकद विचारात घेतल्यास २४ लाख माजी सैनिक, ७ लाख वीर नारी, २८ लाख कुटुंबीय, १२ लाख सेवारत सैनिक, त्यांचे २४ लाख कुटुंबीय आणि २८ लाख इतर कुटुंबीय मिळून एकूण १.२५ कोटी इतकी मोठी लोकसंख्या तयार होते. अनुभव, शिस्त आणि समर्पित असलेले हे मानवी भांडवल राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.’

हेही वाचा – पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल

‘भारतीय सैन्य राज्य सरकारांसमवेत काम करत आहे. या प्रयत्नांमध्ये माजी सैनिकांचा समावेश केल्याने राज्याच्या कामाला होणारा फायदा, मान्यता आणि योगदान यांचे परस्परपूरक नाते निर्माण करणे हे दोन महत्त्वाचे पैलू समांतरपणे पुढे नेण्याची गरज आहे. त्यातून माजी सैनिक आणि राज्य सरकार दोघांचाही फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने जिल्हास्तरावरही काम करण्याचे विचाराधीन आहे. या उपक्रमाचे यश माजी सैनिकांचा समावेश आणि सामूहिक प्रकल्पांमध्ये सहभागासाठीच्या समन्वयावर अवलंबून आहे,’ असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण

माजी सैनिकांसाठी विविध उपक्रम

कल्याणकारी योजनांद्वारे १२ हजार लाभार्थ्यांना ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आला. २८ हजारांहून अधिक माजी सैनिकांना दुसऱ्या करिअरसाठी तयार करण्यात आले. सुमारे साडेपाच हजारांहून अधिक सैनिक, माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनेंतर्गत रोजगारक्षम करण्यात आले. अनेकांना आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला. माजी सैनिकांच्या रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Participation of ex servicemen in nation building is possible opinion of army chief general upendra dwivedi pune print news ccp 14 ssb