वधूपक्षाच्या खोलीतून चोरटय़ांनी हिरेजडीत सोन्याचे दगिने, हार असा १६ लाख ८५ हजारांचा ऐवज ठेवलेली बॅग लांबविली. लोणावळ्यातील बीजीज हिल रिट्रीट रिसॉर्ट हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
सुनिता संजय जैन (वय ४८, रा.पॅरेडाईज अपार्टमेंट, अंधेरी, ए.व्ही रस्ता, मुंबई) यांनी यासंदर्भात लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिता जैन यांच्या नातेवाइकांचा विवाह तुंगार्ली येथील बीजीज हिल रिट्रीट रिसॉर्टमध्ये होता. सुनिता यांनी वधूचे दागिने हॉटेलमधील खोलीत ठेवले होते. हिरेजडीत नेकलेस, कर्णफुले, सोन्याची माळ, साखळी, अंगठी, बांगडी आणि ६५ हजारांची रोकड एका बॅगेत ठेवली होती. शुक्रवारी मध्यरात्री चोरटा वधूपक्षाच्या खोलीत शिरला. दागिने ठेवलेली बॅग लांबवून चोरटा पसार झाला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी तेथे भेट दिली. चोरटा माहीतगार असल्याचा संशय पोलीस निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केला. उपनिरीक्षक नीलेश अपसुंदे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा