पर्वतीत नामसाधर्म्यामुळे महाविकास आघाडीच्या अश्विनी कदमांना फटका? दोन अपक्ष अश्विनी कदमांना किती मते जाणून घ्या…

मिसाळ यांनी तब्बल ५४ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. विशेष म्हणजे, यंदा महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांच्यासह एकूण तीन अश्विनी कदम मैदानात होत्या.

parvati assembly election result 2024 update Three candidates named Ashwini Kadam contested the election
पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

पुणे : पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले होते. मिसाळ यांनी तब्बल ५४ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. विशेष म्हणजे, यंदा महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांच्यासह एकूण तीन अश्विनी कदम मैदानात होत्या.

मागील विधानसभा निवडणुकीत मिसाळ आणि कदम यांच्यात लढत झाली होती. यंदा दोघी पुन्हा आमनेसामने होत्या. गेल्या वेळी मिसाळ यांना ९७ हजार १२ तर कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. यावेळी बागुल यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता होती. गेल्या वेळी या मतदारसंघात ४९.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.२६ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाच्या टक्क्यात सुमारे सहा टक्के वाढ झाली. हा वाढलेला मतटक्काही महत्त्वाचा ठरला.

हेही वाचा…वडगावशेरीत चुरशीची परंपरा कायम- शहरात ‘तुतारी’ वाजली

उमेदवारांना किती मते?

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून मिसाळ यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत २० व्या फेरीअखेर त्या ५४ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यांना १ लाख १८ हजार १९३ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कदम ६३ हजार ५३३ मते मिळाली. काँग्रेस बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना १० हजार ४७६ मते मिळाली. बागुल यांच्या बंडखोरीचा फारसा परिणाम झाला नाही. पहिल्या अपक्ष अश्विनी नितीन कदम यांना ३७८ तर दुसऱ्या अपक्ष अश्विनी अनिल कदम यांना २९४ मते मिळाली.

हेही वाचा…Bhosari vidhan sabha election results 2024 : भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक; अजित गव्हाणेंचा केला पराभव

बंडखोरीचा परिणाम नाही

भाजप आणि माधुरी मिसाळ यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान होते. याच वेळी मागील वेळचा पराभव विजयात परिवर्तित करण्याचे आव्हान अश्विनी कदम यांच्यासमोर होते. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला आबा बागुल यांची बंडखोरी रोखता आली नाही. परंतु, त्याचा फारसा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parvati assembly election result 2024 update three candidates named ashwini kadam contested the election pune print news stj 05 sud 02

First published on: 23-11-2024 at 18:00 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या