यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्वती चढण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून ५० वर्षांपासून ८० वर्षांवरील व्यक्तींसाठी ही स्पर्धा खुली आहे. प्रतिष्ठानचे निमंत्रक शांतीलाल सुरतवाला व अंकुश काकडे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
ही स्पर्धा १४ नोव्हेंबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ दरम्यान होणार असून यात स्पर्धकांना दोन तासात जास्तीत जास्त वेळा पर्वती टेकडी चढायची व उतरायची आहे. ५० ते ६० वर्षे, ६१ ते ७० वर्षे, ७१ ते ८० वर्षे आणि ८० वर्षांवरील कोणीही व्यक्ती अशा चार वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक वयोगटातील स्पर्धा विजेत्यांपैकी प्रथम क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७५० रुपये आणि तृतीय क्रमांकास ५०० रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले ज्येष्ठ नागरिक आपली नावे गांजवे चौकातील आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढी येथे १२ नोव्हेंबपर्यंत सकाळी १० ते १२ या वेळात नोंदवावीत, तसेच अधिक माहितीसाठी ९४२३०७२९८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बाहेरगावच्या स्पर्धकांसाठी स्पर्धेच्या एक दिवस आधी मुक्कामाची सोय केली जाईल, असेही आयोजकांनी कळवले आहे.