पारपत्रासाठी नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी पारपत्र सेवा केंद्रात पारपत्र मेळा भरवण्यात येणार आहे. शनिवारी (४ जानेवारी) हा मेळा भरवण्यात येणार आहे. पारपत्र अधिकारी नरेंद्र सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
पारपत्रासाठी नव्याने अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी  passportindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. या अर्जाबरोबरच ऑनलाइन शुल्कही भरणे आवश्यक आहे. अर्ज व शुल्क भरल्यानंतर संकेतस्थळावरील ‘शेडय़ूल अपॉइंटमेंट’ या पर्यायावर क्लिक करून ४ जानेवारी रोजी आपल्याला जी वेळ सोईची असेल ती निवडायची आहे. भेटीची वेळ ऑनलाइन निश्चित करण्यास २ जानेवारीला दुपारी १२ वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. ‘एआरएन’ (अप्लिकेशन रेफरन्स नंबर) आणि भेटीची वेळ या गोष्टींची छापील प्रत काढून त्या प्रतीसह अर्जदाराने शनिवारी घोरपडी- मुंढवा रस्त्यावरील गंगा ऑर्किड या इमारतीसमोरील पासपोर्ट सेवा केंद्रात ठरल्या वेळी उपस्थित राहावे, असे खात्यातर्फे कळवण्यात आले आहे.
तत्काळ अर्ज, ‘वॉक- इन’ तसेच ‘ऑन होल्ड’ अर्ज या दिवशी स्वीकारण्यात येणार नसून भेटीची वेळ चुकवल्यास अर्ज स्वीकारणार नसल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

Story img Loader