लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : जास्तीचे भाडे मागिल्याने प्रवासी अर्ध्या रस्त्यात उतरून पैसे देऊन दुसऱ्या रिक्षात बसल्याने रिक्षा चालकाने प्रवाशाला दगडाने बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या महिलेला देखील मारहाण केल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर सद्गुरूनगर कमानीजवळ भोसरी येथे घडली.
मोहम्मद यासिन शेख (वय ३६, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे ज्यूस सेंटर आहे. सदगुरुनगर येथून ते ज्यूस सेंटर बंद करून ११ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घरी जात होते. ते आरोपीच्या रिक्षात बसले. आरोपीने शेख यांना प्रवासाचे भाडे जास्त सांगितले. त्यामुळे शेख सदगुरु नगर कमानीजवळ उतरले. रिक्षा चालकाला पैसे दिले आणि दुसऱ्या रिक्षात बसले. त्या कारणावरून आरोपीने शेख यांना दगडाने मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या महिलेला देखील मारहाण केली. त्यानंतर आरोपी रिक्षा घेऊन पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.