उपचारासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेलाही अपघात

पुणे : देवदर्शनासाठी यात्रेकरु महिलांना घेऊन निघालेल्या खासगी प्रवासी बसचालकाच्या बेदरकारपणामुळे बस उलटल्याची घटना फुलगाव-तुळापूर रस्त्यावर घडली. या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून बसचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी महिलांना घेऊन निघालेली रुग्णवाहिका उलटल्याने महिलांना दुखापत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी प्रवासी वाहतूक करणारा बसचालक तुषार भानुदास डाके (वय ३१, रा. खराडी ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा प्रसाद खरे (वय ४८, रा. शनिवार पेठ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रा खरे आणि त्यांच्या मैत्रिणी अष्टविनायक यात्रेसाठी निघाल्या होत्या. फुलगाव ते तुळापूर रस्त्यावर बसचालक तुषार डाके यांनी भरधाव वेगाने बस चालविली. बसचालक डाके याचे नियंत्रण सुटून बस खड्ड्यात कोसळली. अपघातात नऊ महिला जखमी झाल्या.

हेही वाचा >>>अबब! देशातील अतिश्रीमंतांची संख्या पाच वर्षांत ‘एवढी’ वाढणार

अपघातानंतर रुग्णवाहिकेतून महिलांना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, रुग्णवाहिकेचा लोणीकंद परिसरात अपघात झाल्याने पाच महिलांना किरकोळ दुखापत झाली. रुग्णवाहिका चालक विरण उदल चतुर्वेदी जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger bus accident on phulgaon tulpur road pune print news rbk 25 amy