गेल्या काही वर्षांचा विचार करता पुणे विमानतळावरून हवाई प्रवास हे प्रवाशांसाठी एक दिव्य ठरत आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू होऊनही प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र पायाभूत सुविधांचा विस्तार तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यातच विमान कंपन्यांकडून वारंवार विमानांना होणारा विलंब प्रवाशांच्या अडचणींत भर घालणारा ठरत आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये अगदी अपवाद वगळता सर्वांचेच मत नकारात्मक दिसून येते. विमानतळावर प्रवाशांना प्रवास सुसह्य होण्याऐवजी तो असह्य होईल, या पद्धतीने सगळे सुरू आहे. समाजमाध्यमांवर हवाई प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस रोज सुरू आहे. विमान प्रवासात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. प्रवाशांनी वारंवार ओरड करूनही या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडताना दिसत आहे.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कधी सुरू होणार याची चर्चा गेली दोन वर्षे सुरू होती. टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागत नव्हता. उद्घाटनाला मुहूर्त लागल्यानंतर ते सुरू कधी होणार याची प्रतीक्षा होती. उद्घाटनानंतर सहा महिन्यांनी नवीन टर्मिनल सुरू झाले. या कालावधीत पुणेकर हवाई प्रवाशांचे हाल सुरूच होते. आणि आता टर्मिनल सुरू होऊनही हाल सुरूच आहेत. प्रवाशांना नवीन टर्मिनलवरून पायपीट करीत एरोमॉल गाठावा लागत आहे. या एरोमॉलमध्ये पार्किंग असून, ओला आणि उबर तिथूनच घ्याव्या लागतात. नवीन टर्मिनलपासून एरोमॉल दूर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने दोन ई-बस सुरू केल्या आहेत. तरीही प्रवाशांची ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
पुणे विमानतळ हे हवाई दलाच्या मालकीचे आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर मर्यादा आहेत. विमानतळाची धावपट्टी सकाळी ८ ते १०.३० या वेळेत बंद असते. या कालावधीत हवाई दलाचा सराव सुरू असतो. काही दिवसांपूर्वी हवाई दलाने धावपट्टी आणखी अर्ध्या तासासाठी ताब्यात घेतल्याने तीन विमाने दुसरीकडे वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. हाच प्रकार विमानांच्या विलंबाचा आहे. काही विमानांना पाच ते सहा तास विलंब होत असून, विमान कंपन्यांकडून विमानतळावर पोहोचल्यानंतर याची माहिती प्रवाशांना दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडून जाण्याबरोबरच त्यांची मोठी गैरसोय होते.
आणखी वाचा-सोलापूरमधील गांजा तस्कर गजाआड
पुण्यातून केवळ दोन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. त्यात वाढ करण्यासाठी पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करावा लागणार आहे. याबाबतचे सर्वेक्षण नुकतेच झाले आहे. धावपट्टीसोबत विमानतळातील पार्किंग बेचाही विस्तार करावा लागणार आहे. हवाई दलाची मालकी आणि विमानतळावरील जागेची मर्यादा लक्षात घेता, हे कितपत शक्य आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे हा गुंता सुटेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे हवाई दलाच्या विमानतळावर विसंबून राहण्याऐवजी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी व्हायला हवी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्याने पुणेकर हवाई प्रवाशांच्या अडचणी सुटतील, अशी आशा प्रवाशांना आहे.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार, असे राज्यकर्ते वारंवार उच्चरवाने सांगत असले, तरी त्यासाठी पावले मात्र उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक चर्चा आणि प्रस्तावाच्या पलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे पुण्यात खरेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याचा भविष्यातील विस्तार आणि उद्योग-व्यवसायांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी सातत्याने केली जात आहे. भविष्यातील पुण्यासाठी आवश्यक असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप हवेतच असल्याचे चित्र आहे. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा लावून धरण्याची गरज निर्माण झाली आहे.
sanjay.jadhav@expressindia.com