पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हे रविवारी स्वारगेट एसटी स्थानकातून साताऱ्याकडे निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारात ते फलाटावर एसटी बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी त्यांची नजर चुकवून लॅपटाॅप असलेली पिशवी चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात महाडला निघालेल्या एका प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना घडली होती. प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीची आणखी एक घटना घडली.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीला धमकावून दत्तात्रय गाडे याने बलात्कार केला होता. बलात्काराची घटना घडल्यानंतर स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली हाेती. आवारात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली, तसेच बंदोबस्तास पोलीस तैनात करण्यात आले. बंदोबस्त वाढविल्यानंतर एसटी स्थानकाच्या आवरात प्रवाशांकडील ऐवज, लॅपटाॅप चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.