एखादी दुर्घटना घडल्याशिवाय उपाययोजना करायचीच नाही का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीएमपी गाडय़ांची दुरवस्था, हा कायम चिंतेचा आणि टीकेचा विषय आहे. पीएमपीच्या धावत्या गाडीने पेट घेण्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. मात्र, त्याचे कोणालाही गांभीर्य नाही. एखादी दुर्घटना घडल्याशिवाय काही करायचेच नाही, अशी मानसिकता पीएमपी प्रशासनातही दिसून येते.

पुणे महानगर परिवहन महामंळाच्या (पीएमपी) प्रवासी गाडय़ांची दुरवस्था आपण दररोजच पाहतो. भर रस्त्यात बंद पडलेली गाडी कधी दिसते,तर कधी प्रवासीच गाडीला धक्का मारताना दिसतात. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमपी गाडय़ांच्या दुर्घटना, हा चिंतेचा विषय बनला आहे. दोनच दिवसापूर्वी, देहूरोड-किवळे मार्गावर पीएमपीची गाडी पलटी झाली, त्यामुळे आतील नऊ प्रवासी जखमी झाले. चालकाला चक्कर आली म्हणून नियंत्रण सुटल्याचे एकीकडे सांगण्यात येत होते. तर, नादुरूस्त रस्त्यांमुळे हा अपघात घडल्याचे खापरही फोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी, पिंपरी पालिका मुख्यालयासमोर चालत्या पीएमपीला आग लागण्याची घटना घडली. चालक आणि वाहकांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच प्रवासी खाली उतरवण्यात आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला होता. अशाच प्रकारे पुणे व पिंपरीत गाडय़ा पेटण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. कारण, तसे प्रकार पुन्हा-पुन्हा होतच आहेत.

ऐन रहदारीच्या रस्त्यावर बंद पडलेल्या पीएमपीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र, ती गाडी वेळीच बाजूला काढण्याची तत्परता अथवा सौजन्य दाखवण्यात येत नाही, त्याचा हजारो वाहनस्वारांना मनस्ताप होतो. पीएमपी बंद पडली म्हणून सारे प्रवासी रस्त्यावर उभे आहेत किंवा गाडी सुरू करण्यासाठी प्रवासी धक्का देत आहेत, हे चित्र शहरातील अनेक रस्त्यांवर हमखास दिसते. पीएमपीची नादुरूस्त वाहने रस्त्यावर आणली जातात, त्यातून हे प्रकार घडतात. पीएमपीचा उत्पन्न वाढवण्याचा हिशेब असू शकतो. लाखोंच्या संख्येने प्रवासी पीएमपीने प्रवास करतात, मात्र त्यांची सुरक्षितता हा मुद्दा लक्षात घेतला जात नाही. पीएमपीने अनेक महत्त्वाच्या कामांसाठी मानधनावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. इतर विभागातील निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. पीएमपीचे अधिकारी स्वत: जबाबदारी घेत नाहीत. आजमितीला बहुतांश आगारात नादुरूस्त, अपघातग्रस्त गाडय़ा आहेत. दररोज कुठेतरी पीएमपी बसची अप्रिय घटना घडत असतानाही त्याचे सोयरसुतक पीएमपी प्रशासनाला नाही. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांच्या जीविताशी खेळ होता कामा नये. एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर धावपळ आणि आरडाओरड करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतली पाहिजे. मात्र, तसेही होताना दिसत नाही.

काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड

पिंपरी-चिंचवड म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, सद्य:स्थितीत काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहेत. काँग्रेसचे अनेक तगडे मोहरे पक्ष सोडून गेले. जे राहिले, त्यांना सोबत घेऊन शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू आहे. आगामी निवडणुकांसाठी तयारी म्हणून शहर काँग्रेसने विविध पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्तया केल्या आहेत. त्यानुसार, पृथ्वीराज साठे, संग्राम तावडे आणि शानी नौशाद यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून संधी देण्यात आली असून विभागीय अध्यक्षपदी (ब्लॉक अध्यक्ष) विष्णूपंत नेवाळे (भोसरी) बाळासाहेब साळुंके (पिंपरी) व परशुराम गुंजाळ (चिंचवड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल. संघटनात्मक बांधणी तसेच पक्षविस्ताराच्या कामास प्राधान्य देण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने पक्षाचे विविध मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे सचिन साठे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेची आक्रमकता

पिंपरी-चिंचवड शहरात स्थानिक मंडळींचे एकतर्फी वर्चस्व असतानाच्या काळात त्यांचा रोष पत्करून शिवसेनेचा भगवा फडकवत शहरभरात पक्षविस्तार करणारे जे मोजके आणि लढवय्ये नेते शिवसेनेत होते, त्यामध्ये गजानन बाबर आणि बाबासाहेब धुमाळ यांचे नाव घ्यावेच लागते. ४० वर्षे शिवसेनेत काढल्यानंतर बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता आपले कार्यक्षेत्र साताऱ्याकडे स्थलांतरित केले. काही महिन्यांपासून बाबरांच्या राजकीय म्हणता येईल, अशा सर्व घडामोडी साताऱ्यात सुरू आहेत. दुसरे नेते म्हणजे, बाबा धुमाळ. रविवारी धुमाळ यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. धुमाळ यांच्या अकाली जाण्याने शिवसेना वर्तुळात मोठा धक्काच बसला. बाबर आणि धुमाळ या दोन नावांशिवाय शहर शिवसेनेचा इतिहास मांडता येणार नाही. दोघांचा राजकीय प्रवास एकत्रित सुरू झाला. मात्र, त्यांच्यातून विस्तव जात नव्हता. एकमेकांना शक्य तितका विरोध करण्याचे तसेच कुरघोडीचे राजकारण त्यांनी केले. मात्र, शिवसेनेसाठी ते दोन मोठे आधारस्तंभ होते. शहर शिवसेना बाबर-धुमाळ अशा दोन गटात विभागली होती. मात्र, ‘शिवसेना स्टाईल’ म्हणून जी आंदोलने ओळखली जातात तशी अनेक आक्रमक आंदोलने दोघांच्या नेतृत्वाखाली झाली, हे शहराने पाहिले आहे. अलीकडच्या काही वर्षांत बाहेरील नेते शिवसेनेत आले आणि पक्षात त्यांचाच वरचष्मा निर्माण झाला.

परिणामी, बाबर, धुमाळ यांच्यासारख्या जुन्यांचे महत्त्व कमी होत गेले. आजमितीला ज्यांच्या हातात पक्षाची सारी सूत्रे आहेत, ते बाहेरून आले आहेत. बाबर व धुमाळ यांच्या काळात असलेली शिवसेनेची आक्रमकता आता मात्र दिसून येत नाही.

बाळासाहेब जवळकर – balasaheb.javalkar@expressindia.com

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger life in danger due to pmpml buses accident