पुणे: मेट्रोची विस्तारित मार्गावरील सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे मेट्रोने रविवारी (ता. ६) तब्बल ९५ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. परंतु, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे. कारण अनेक मेट्रो स्थानकात वाहनतळ नसल्याने प्रवाशांना वाहन घेऊन स्थानकापर्यंत जाणे शक्य होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
मेट्रोची सेवा वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गांवर सुरू आहे. हे विस्तारित मार्ग १ ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर मेट्रोला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. परंतु, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न पुणेकरांना भेडसावत आहे. अनेक स्थानकांमध्ये वाहनतळ नसल्याने तिथे दुचाकी अथवा इतर वाहनाने जाणे शक्य नाही. याच वेळी घरापासून रिक्षाने जायचे झाल्यास आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, अशी तक्रार प्रवासी करीत आहेत.
आणखी वाचा-सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख असलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचेच समाजमाध्यमातील खाते ‘हॅक’
वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर वनाझ, आनंदनगर, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, पुणे महापालिका आणि रुबी हॉल या स्थानकांना सध्या वाहनतळ नाही. पुढे या मेट्रो मार्गाचा विस्तार रामवाडीपर्यंत होणार असून, बंडगार्डन, येरवडा आणि रामवाडी स्थानकांनाही वाहनतळ नसेल. गरवारे स्थानकावरील छोटा वाहनतळ, पुणे स्थानकावरील रेल्वेचा वाहनतळ, मंगळवार पेठ आणि कल्याणीनगर स्थानकावरील छोटे वाहनतळ हे सध्या आहेत. हे वाहनतळ प्रामुख्याने दुचाकींसाठी आहेत. शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय स्थानकात मात्र वाहनतळासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. याचबरोबर स्वारगेट स्थानकावरही वाहनतळासाठी जागा असणार आहे.
खासगी जागांवर वाहनतळांचा प्रस्ताव
मेट्रो स्थानकांची उभारणी करताना शेजारी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले. परंतु, अनेक स्थानके शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने वाहनतळासाठी जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे महामेट्रोने तिथे वाहनतळ उभारले नाहीत. अशा स्थानकांच्या ठिकाणी खासगी जागा मोकळी असल्यास ती भाडेतत्त्वावर घेऊन वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत महामेट्रोकडून हालचाली सुरू आहेत.
आणखी वाचा- पुण्यातील दहशतवादी प्रकरण ‘एनआयए’कडे; ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे उघड
प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी…
- पीएमपी बसची फीडर सेवा काही ठिकाणी सुरू
- प्रत्येक स्थानकापासून ठरावीक मार्गांवर शेअर रिक्षाचा प्रस्ताव
- स्थानकांवर सायकली ठेवण्याचा विचार सुरू
- ई-सायकलींच्या प्रस्तावावरही विचार
खासगी वाहने टाळून पुणेकरांनी मेट्रोसह इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असा आमचा प्रयत्न आहे. जागेच्या अडचणीमुळे अनेक स्थानकांच्या ठिकाणी वाहनतळ उभारणे शक्य झाले नाही. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. -हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो