लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बारामतीहून पुण्याला सकाळी व दुपारी रेल्वेची सेवा सध्या कार्यरत आहे, मात्र या रेल्वे ऐवजी मुंबईच्या लोकलच्या धरतीवर वेगवान गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विस्तारित असलेल्या बारामती परिसराचे गेल्या काही वर्षांमध्ये वेगवान झालेले विकासातून नागरीकरण, रस्ते वाहतुकीवरील वाढलेला ताण, सतत वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ, रस्ते वाहतुकीसाठी लागलेला खर्च, या बाबी विचारत घेता बारामती-पुणे-बारामती या रेल्वे मार्गावर रेल्वेने बारामती पुणे बारामती लोकल सेवा सुरू करावी, अशी बारामतीकरांची जुनी आग्रही मागणी आहे.
सध्या बारामतीहून पुण्याला सकाळी आणि संद्याकाळी रेल्वेची सेवा कार्यरत आहे. मात्र या रेल्वे ऐवजी मुंबईतील लोकलच्या धरतीवर वेगवान गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरीत आहे, सध्या रेल्वेच्या प्रवासाला जवळपास सव्वा तीन तासाहून अधिकचा काळ लागत आहे, हा वेळ कमी करून तो दोन तासापर्यंत आणल्यास पुणे बारामती पुणे ही रेल्वे सेवा अधिक लोकप्रिय होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.
बारामती पुणे ही रेल्वे सेवा पुढे वाढवून पुणे – लोणावळा ते कर्जत पर्यंत कायम केली तर रेल्वेला अधिक उत्तम प्रतिसाद मिळेल, गेल्या काही दिवसात बारामती पुणे बारामती एसटी बसचा प्रवास हा अती महागडा झालेला आहे, नुकताच झालेल्या एसटीच्या भाववाढीनंतर बारामती पुणे हिरकणी या गाडीचे तिकीट रुपये २३८ आणि शिवशाहीचे तिकीट रुपये २६४ इतके आहे.
पुण्याला जाऊन यायचे असेल तर रुपये ४७६ हिरकणीला आणि शिवशाहीसाठी ५२८ इतके रुपये मोजावेच लागतात, तर दुसरीकडे रेल्वेचा मासिक पास अवघ्या ४४० रुपयात मिळतो, याचाच अर्थ महिनाभर रेल्वेने प्रवास केल्यास जाऊन येऊन अवघे पंधरा रुपयातच प्रवास होऊ शकतो, तसेही रेल्वेचे बारामती आणि पुणे रेल्वेचे तिकीट ३० रुपये आहे, ही तुलना सर्वसामान्य माणसांसाठी महत्त्वाचीच आहे. बारामतीतील नागरीक लोकल रेल्वेची मागणी का करीत आहेत, हे गणित वरील आकडेवारीतच स्पष्टपणे दिसत आहे.
बारामती हून पुण्याला दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, अनेकांना एसटी बस पेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक सुखकारक वाटतो, या पार्श्वभूमीवर बारामती दौंड पुणे अशी वेगवान रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे, कोरोना साथीच्या काळात बारामती दौंड पुणे लोणावळा कर्जत अशी रेल्वे सुविधा उपलब्ध होती, त्या रेल्वे सुविधेचा कालावधी ही नोकरदारांसाठी आणि व्यापाऱ्यांना साठी योग्य होती पुणे बारामती आणि बारामती पुणे यासाठी योग्य पद्धतीने सुरू करण्यात आली होती, मात्र करोना साथीच्या काळानंतर रेल्वे सेवा काही दिवसांसाठी बंद केली, आणि पूर्वीचा रेल्वेचा जो कार्यकाळ होता तो सुद्धा बदलला, यामुळे प्रवासांची ही मोठी गैरसोय झाली होती, नंतर बारामती दौण्ड पुणे आणि पुणे दौण्ड बारामती अशा रेल्वे फेरा सुरू केल्या आहेत. या फेऱ्या प्रवाशांच्या सोयीच्या मानल्या जात नाही, अशी बारामतीतल्या काही प्रवाशांचे म्हणणे आहे. कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी रेल्वेच्या ज्या फेऱ्या सुरू केल्या होत्या, त्या फेरा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
बारामती मतदारसंघासाठी सध्या तीन खासदार आहेत, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याकडे व्यापारी वर्गाने ही मागणी मांडून पुणे बारामती अशी वेगवान रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करू अशी माहिती माध्यमांशी बोलताना व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष स्थानीक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य जवाहर शहा वाघोलीकर यांनी सांगितले.
बारामती पुणे अशी लोकल सेवा सुरू केल्यास व्यापारी वर्गाला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, प्रवास खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होण्याबरोबरच खरेदी केलेला माल ही रेल्वेतून सोबत आणणे सोयीस्कर होणार आहे, वेळ कमी लागला तर रेल्वेसाठी व्यापारी सुद्धा प्राधान्य देतील, मुंबईला जोडणाऱ्या गाड्यांनी जोडणी केल्यास याचा अधिक लाभ प्रवासी नागरिकांना होईल, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
बारामती पुणे वेगवान लोकल सेवा ही सर्वांसाठी फायदेशीर ठरणारी आहे, सकाळी व संध्याकाळी रेल्वे गाड्यांच्या वेळा व्यवस्थित असतील तर लोक रेल्वेच्या प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतील, या माध्यमातून स्वतःची चार चाकी वाहने वापरण्याचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी माध्यम अशी बोलताना सांगितली.