पुणे : प्रवासी वाहतूक करताना मोबाईल पाहणे किंवा इलेक्ट्राॅनिक उपकरणे वापरणे (हेडफोन, इअरबड्स) चालकांना आता महागात पडणार आहे. त्यानुसार सरकारी-निमसरकारी तसेच खासगी प्रवासी वाहनांसाठी स्वतंत्र नियमावली अंमलात आणण्याासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) आदर्श कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार आहे.
प्रवासी वाहतूक करणारा बसचालक वाहन चालवताना क्रिकेट सामना बघत असल्याचे छायाचित्र समोर आल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित चालकावर कारवाई करण्यात आली. मात्र, खासगी वाहनचालकांकडून असे प्रकार घडल्याने मृ्त्यू, अपघाताची शक्यता वाढते. गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर सहजतेने होत असून रिक्षा, कारचालक किंवा इतर प्रवासी वाहनचालकांकडून असे वर्तन होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारी, निमसरकारी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांच्या गैरवर्तनाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, तज्ज्ञांची समिती स्थापन करून कायदेशीर नियमावली तयार करण्याचे आदेश दिले.
प्रादेशिक परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कायद्यांच्या अनुषंगाने नियमावली तयार करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलचा किंवा आधुनिक उपकरणांचा सहजतेने होणारा वापर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपायोजनांची आवश्यकता आहे, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
प्रवासी वाहने चालविताना चालकाकडून मोबाईल किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर झाला, तर इतर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होतो. ही बाब गंभीर आहे. अशा अनुचित घटना टाळण्यासाठी परिवहनमंत्र्यांच्या आदेशानुसार तज्ज्ञांची मदत घेऊन सरकारी, निमसरकारी आणि खासगी प्रवासी वाहनांसाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात येईल. – विवेक भीमनवार, आयुक्त, प्रादेशिक परिवहन कार्यालय