पुणे: उत्तरेतील राज्यांतील धुक्यामुळे सलग चौथ्या दिवशी बुधवारी पुणे विमानतळावरील विमानसेवेला फटका बसला. पुणे विमानतळावरून जाणारे एक आणि येणारी दोन विमाने रद्द करण्यात आली. मागील काही दिवसांपेक्षा विमान रद्द होण्याचे प्रमाण कमी असले, तरी विमानतळावरील सेवेतील गोंधळामुळे प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागला.

हेही वाचा >>> खाद्यतेल वर्षभर स्वस्त; आयातीला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ

विमानसेवेला उत्तरेतील धुक्याचा बसणारा फटका काही प्रमाणात आता कमी झाला आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील तीन विमाने रद्द करण्यात आली. त्यात पुणे ते गुवाहाटी, गुवाहाटी ते पुणे, वाराणसी ते पुणे या तीन विमानांचा समावेश आहे. देशात उत्तरेत धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रविवारपासून विमाने रद्द होण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक विमानांना पाच ते सहा तासांहून अधिक विलंब होत होता. खराब हवामानाचा विमानसेवेला बसणारा फटका आता कमी झाला आहे. विमाने रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी विमानतळावरील नियोजनाचा फटका प्रवाशांना बुधवारी बसला. अनेक प्रवाशांनी याबाबत समाजमाध्यमांवर तक्रारी केल्या आहेत. विमानतळावर चेक इन करण्यासाठी एक तासाहून अधिक काळ रांगेत थांबावे लागल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. विमान कंपन्यांच्या सेवेवरही अनेक प्रवाशांनी ताशेरे ओढले आहेत. विमान कंपन्या आणि विमानतळावरील सेवेच्या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. डिजियात्राचा वापर प्रवाशांसाठी ऐच्छिक असतानाही प्रवाशांना त्याची सक्ती केली जात असल्याचा अनुभव अनेक जणांनी मांडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.