पुणे : नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाचे (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी – बीसीएएस) निर्देश आणि हवाई दलाच्या सुरक्षिततेच्या काऱणास्वत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस थांब्याला विमानतळाच्या आत परवानगी देता येणार नसल्याचे विमानतळ प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होणार असून हवाई प्रवाशांनाही ३०० ते ४०० मीटर दूर पर्यंत पायपीट करावीच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महाराष्ट्र मेट्रो रेलने कार्पोरेशनची (महामेट्रो) रामवाडीपर्यंतच मार्गिका असल्याने विमानतळापर्यंत जाण्यासाठी ‘पीएमपी’ची पूरक (फीडर) बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या विमानतळ प्रवेशद्वाराच्या बाहेर ३०० ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या एरोमाॅलच्या ठिकाणीच थांबा देण्यात आला. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाने विमानतळ प्रशासनाला पत्र पाठवून विमानतळाच्या आतील बाजूला (टर्मिनलच्या बाहेरील काही बाजू अंतरापर्यंत) थांबा निश्चित करून द्यावा, जेणेकरून प्रवाशांना सहजरीत्या विमानतळापर्यंतचा प्रवास करता येईल, असेही नमूद करण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही कुठलेच स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले.

सद्य स्थितीला प्रवाशांना एरोमाॅलजवळ असलेल्या बहुद्देशीय वाहनतळापासून अवजड बॅग घेऊन टर्मिनल पर्यंत पायपीट करावी लागत आहे. याबाबत प्रवाशांकडूनही तक्रारी करण्यात आल्या. विमानतळ प्राधिकरणाने अखेर ‘बीसीएएस’च्या निर्देशानुसार आणि हवाई दलाची जागा असल्याने एरोमाॅल परिसराजवळील बहुद्देशीय वाहनतळाच्या ठिकाणीच बसची सेवा राहिल, असे निश्चित केले आहे. त्यामुळे प्रवाशांना एरोमाॅलपासून सुरक्षित जीन्याच्या माध्यमातून किंवा रस्ता ओलांडून विमानतळाच्या प्रवेशद्वारून पायपीट करतच हवाई प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे ‘बीसीएएस’चे निर्देश ?

नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाच्या (बीसीएएस) सुरक्षीततेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही विमानतळावर १०० मीटर अंतरापर्यंत खासगी, प्रवासी वाहतूक सेवेतील वाहनांना प्रवेश देऊ नये. जेणेकरून सुरक्षितता आणि प्रवाशांना सुलभ प्रवास करताना अडचण निर्माण होईल.

विमानतळाच्या परिसरात प्रवाशांना सहज आणि सुलभ प्रवास करता यावा म्हणून विमानतळ खासगी कार, बस, व्यावसायिक वाहने, प्रवासी बस यांच्यासाठी एरोमाॅलच्या ठिकाणी बहुद्देशीय वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विमानतळातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी ३५ आसन असलेली मोफत ई-बस आणि सहा ‘गोल्फ कार्ट वाहने’ आणि टर्मिनल ते एरोमाॅलमधील वाहनतळापर्यंत सरकते जीना आणि पूल निर्माण करून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, बीसीएएसच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात येत असून तेथून पुढचा परिसर हा हवाई दलाच्या अखत्यारीतील असून त्यांच्याकडूनही सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली असल्याने एरोमाॅलच्या वाहनतळापासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा प्रवाशांना लाभ घ्यावा.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

विमानतळापर्यंत मेट्रोची सेवा नसल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार रामवाडी मेट्रो स्थानकापासून विमानतळापर्यंत फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, एरोमाॅलपर्यंतच बस सुविधा असल्याने बस रिकाम्या राहतात. बाहेर पडताना थेट एरोमाॅलच्या जीन्यातून कारतळापर्यंत प्रवासी जात असून अनेकांना टर्मिनलमधून बाहेर पडल्यानंतर जड बॅग घेऊन बाहेर चालत येणे शक्य नसल्याने बससुविधेकडे दूर्लक्ष केले जात आहे. ही बाब लक्षात आणून देत विमानतळाच्या प्रवेशद्वाराच्या आत काही दूर अंतरावर थांबा मिळावा अशी मागणी केली होती.

नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी