मी प्रवासी नाकारणार नाही.. मीटरनेच व्यवसाय करेन.. वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन.. ही आदर्श वाटावी अशी आचारसंहिता केली आहे, आम आदमी रिक्षा संघटनेने.
झपाटय़ाने वाढणाऱ्या आणि महानगराकडे वाटचाल करीत असलेल्या पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नाही. त्यामुळे सर्वाधिक दुचाकींचे शहर असा लौकिक असलेल्या पुणेकरांना वाहतुकीसाठी रिक्षांवर अलवंबून राहावे लागते. त्याचा फायदा रिक्षाचालक घेतात, असा नागरिकांचा अनुभव असून अनेकदा रिक्षाचालक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भावतात. त्या पाश्र्वभूमीवर नागरिकांमध्ये रिक्षाचालकांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि कायदेशीर, प्रामाणिकपणे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या रिक्षाचालकांसाठी संघटनेने एक आचारसंहिता तयार केली आहे. या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी संघटनेशी संबंधित रिक्षाचालकांचे प्रबोधन करणे, प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मार्गदर्शन रिक्षाचालकांना स्पर्धात्मक बनविणे असे उपक्रम आम आदमी रिक्षा संघटनेने हाती घेतले आहेत. संघटनेचे संस्थापक असगर बेग आणि अध्यक्ष गणेश ढमाले यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
बेकायदेशीर शहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्याकडे केली असल्याचे ढमाले यांनी सांगितले. आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने नुकतेच ‘पुछो’ हे मोबाइल अॅप सुरू केले असून त्याद्वारे दिल्लीकर नागरिकांना जेव्हा आणि जेथे हवे तेथे रिक्षा मागविण्यासाठी मदत होत आहे. त्याच धर्तीवर पुणे शहरात अशी सुविधा सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Story img Loader