पुणे : आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये पल्मनरी एम्बोलिझम म्हणजेच फुफ्फुसातील धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू लागला आहे. सातत्याने लांब अंतराचा हवाई प्रवास करणाऱ्या व्यक्तींमध्ये या तक्रारी अधिक दिसून येत आहेत. या प्रवाशांमध्ये छातीत अस्वस्थता आणि धाप लागण्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये पल्मनरी एम्बोलिझमचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. अशा प्रकारच्या १७ रुग्णांवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. रक्ताच्या गाठी विरघळवणारी पारंपरिक औषधे अशा वेळी फार उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे उपचारासाठी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी हा पर्याय निवडावा लागतो. मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी या उपचार पद्धतीमध्ये कॅथेटरचा वापर करून एका छोट्या उपकरणाच्या साहाय्याने रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्ताच्या गुठळ्या काढून टाकल्या जातात.
हेही वाचा >>> ज्येष्ठ नागरिकाच्या जगण्याची केवळ दोन टक्के शक्यता असूनही असे वाचले प्राण…
पल्मनरी एम्बोलिझम हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचे तिसरे कारण म्हणूनदेखील याचा उल्लेख केला जातो. विशेषत: तरुण वर्गामध्ये याचा अधिक धोका दिसून येत आहे. हा आजार टाळण्यासाठी लांब अंतराच्या हवाई प्रवासादरम्यान काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर या आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा >>> किनारपट्टी, विदर्भात मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
कारणे कोणती?
पल्मनरी एम्बोलिझम म्हणजे फुफ्फुसातील धमनीमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होऊन ती रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. यामुळे फुफ्फुसाचा रक्तप्रवाह रोखला जातो. विमान प्रवासादरम्यान रुग्णांची दीर्घकाळ शारीरिक हालचाल होत नाही. चार तासांपेक्षा जास्त कालावधीचे उड्डाण असल्यास त्यात रक्त गोठण्याचा धोका तिप्पट असतो. तसेच, बसण्याची जागा, शरीरातील पाण्याची आणि प्राणवायूची पातळी कमी होणे यामुळेही हा धोका वाढू शकतो, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्समधील डॉ. कौरभी झाडे यांनी दिली.
उपाय काय?
अधिकाधिक लांबच्या हवाई प्रवासाला प्राधान्य दिले जाते. असा प्रवास करताना पल्मनरी एम्बोलिझमसारखा त्रास टाळण्यासाठी काय करावे आणि करू नये याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. विमान प्रवासादरम्यान दर अर्ध्या तासाने चालणे, सतत पाणी पिणे आणि मद्यपान टाळणे यांसारख्या साध्या गोष्टी करून हा धोका टाळता येतो, असे डॉ. कपिल बोरावके यांनी सांगितले.