पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली असून, या प्रकियेबाबत ऑनलाईन यंत्रणेत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. पारपत्र काढण्यासाठी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे पारपत्र काढण्यासाठी एजंटची गरज असते ही मानसिकता नागरिकांनी बदलली पाहिजे, असे आवाहन पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी केले.
इंडियन एक्स्प्रेसच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकांना सुलभतेने व लवकरात लवकर पारपत्र देण्याच्या दृष्टीने पारपत्र कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांनी गोतसुर्वे यांनी या वेळी माहिती दिली. ते म्हणाले, पारपत्र काढण्यासाठी एजंटच असावा, ही नागरिकांची मानसिकता झाली आहे. मात्र, एजंटची गरज भासणार नाही, अशा पद्धतीची कार्यवाही आम्ही सुरू केली आहे. कार्यालयातील चौकशी खिडक्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कार्यालयात आलेला नागरिक काम पूर्ण करून कमी वेळेत बाहेर पडेल, अशी यंत्रणा राबविण्याचा प्रयत्न आहे.
पारपत्रासाठी अर्ज केल्यानंतर ६० दिवसात पारपत्र देण्याचा कालावधी आम्ही सध्या ४० दिवसांवर आणला आहे. तत्काळसाठी प्रक्रियेनुसार आठवडाभरात पारपत्र मिळू शकते. सध्या पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुणे विभागामध्ये रोज बाराशे अर्ज येतात. त्यातील केवळ १५ टक्के अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळले जातात. बाहेरून पुण्यात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी यांच्याबरोबरच विविध संस्थांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या योजनांमुळे पारपत्र मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन सुविधांमध्ये वाढ करण्याचे धोरण आम्ही अवलंबले आहे.
‘शासकीय कर्मचाऱ्याला पोलीस पडताळणीची गरज नाही’
पासपोर्ट काढण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला पोलीस पडताळणी करण्याची गरज नाही. संबंधित कर्मचाऱ्याने अर्जाबरोबरच तो काम करीत असलेल्या खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र जोडल्यास पोलीस पडताळणीशिवाय त्याला पारपत्र मिळू शकते. याची माहिती नसल्याने अनेक शासकीय कर्मचारी पोलीस पडताळणी करून घेण्यासाठी वेळ घालवतात, अशी माहिती पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.
‘तत्काळ पारपत्रासाठी आयएस, आयपीएसचे पत्र कशाला?’
तत्काळ पद्धतीत पारपत्र मिळविण्यासाठी आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे पत्र द्यावे लागते. असे पत्र असलेल्यांना आठवडय़ाच्या कालावधीत पारपत्र दिले जाते. पारपत्र देताना त्यांची पोलीस पडताळणी होत नसली, तरी ही पडताळणी नंतर केली जाते. तत्काळसाठी असे पत्र नसणाऱ्यांसाठीही त्याच कालावधीत पारपत्र मिळू शकते. पारपत्रासाठी दिलेल्या १६ पुराव्यांपैकी संबंधिताला तीन पुरावे सादर करावे लागतात. त्याबरोबरीने पोलीस तपासणीही होणे गरजेचे असते, असे अतुल गोतसुर्वे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader