पुणे : पारपत्र काढताना तसेच नूतनीकरण प्रसंगी जोडीदाराचे आडनाव लावताना यापुढे अर्जदार महिलांना ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र’ आवश्यक नाही. अर्जदारांच्या सोयीसाठी केंद्रीय पारपत्र कार्यालयाने नव्याने ‘परिशिष्ट जे’ (अनेक्श्चर) हा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पारपत्रामध्ये जोडीदाराचे संपूर्ण नाव जोडीदार म्हणून टाकण्यासाठी (नवीन आणि नूतनीकरण) विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास संयुक्त छायाचित्र जाहीरनाम्याचा (परिशिष्ट जे) वापर करता येईल. मात्र, या परिशिष्टावर पती-पत्नी दोघांचे एकत्र छायाचित्र, स्वाक्षरी, दोघांची जन्म तारीख, आधारकार्ड क्रमांक, मतदानाचे ओळखपत्र किंवा पारपत्र क्रमांक लिहिणे बंधकारक आहे, अशी माहिती पुण्याचे प्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी दिली.

तसेच, पारपत्रावरून जोडीदाराचे नाव वगळण्यासाठी घटस्फोटाच्या आदेशाची प्रत आवश्यक आहे. जोडीदाराचे नाव बदलण्यासाठी, घटस्फोटाच्या आदेशाची प्रत किंवा पहिल्या जोडीदाराचा मृत्यू दाखला आणि नवरा-बायको दोघांकडून पुनर्विवाह प्रमाणपत्र किंवा संयुक्त छायाचित्र जाहीरनामा आवश्यक आहे. अर्जदार किंवा जोडीदाराला नाव संपूर्ण बदलण्याचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया असून, पारपत्र कार्यालयाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती उपलब्ध आहे, असे डॉ. देवरे यांनी सांगितले.

लग्नानंतर महिला सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या संपूर्ण नावांमध्ये असलेले वडिलांचे नाव आणि माहेरचे आडनाव बदलून त्याजागी पतीचे नाव अणि आडनाव लिहितात. अशा महिलांना आता स्टेट गॅझेटमध्ये किंवा दोन वृत्तपत्रांमध्ये नाव बदलीची जाहिरात द्यावी लागेल आणि त्यासोबत त्या संपूर्ण नवीन नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशी दोन ओळखपत्र द्यावी लागतील, याकडे देवरे यांनी लक्ष वेधले.