प्रादेशिक पारपत्र कार्यालयातर्फे २६ जुलै रोजी (शनिवार) मुंढव्यातील पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्ट मेळ्याचे आयोजन केले आहे. पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील अर्जदारांना या पासपोर्ट मेळ्याचा लाभ घेता येणार आहे. पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे.
तत्काळ सेवेद्वारे पारपत्र काढू इच्छिणाऱ्या २०० तर सामान्य सेवेद्वारे पासपोर्ट कोढू इच्छिणाऱ्या ६०० अर्जदारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. ‘ऑन होल्ड’, ‘वॉक-इन’ आणि ‘पीसीसी’ (पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट) या प्रकारच्या अर्जदारांना या वेळात भेटता येणार नाही, असे कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.
ज्या अर्जदारांना २६ जुलैच्या पासपोर्ट मेळ्याचा लाभ घ्यायची इच्छा असेल त्यांनी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, ऑनलाईन शुल्क भरावे आणि भेटीची वेळ निश्चित करावी, असेही कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. सामान्य प्रक्रियेसाठी २१ जुलै रोजी तर तत्काळ पारपत्रासाठी २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भेटीची वेळ निश्चित करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
ज्या अर्जदारांनी ‘तत्काळ’ पारपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांचा अर्ज ‘सामान्य’ सेवा प्रक्रियेसाठी वर्ग करता येणार नाही, तसेच सामान्य सेवा प्रक्रियेतील अर्ज तत्काळ प्रक्रियेसाठी वर्ग करता येणार नाही. अर्जदारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तरच त्यांनी भेटीची वेळ निश्चित करावी, असेही कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा