दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अनेक विद्यार्थी जन्माचा मूळ दाखला आणि दहावीचे प्रमाणपत्र पुढील शिक्षणसंस्थेत सादर करतात. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेताना पदवीचे मूळ प्रमाणपत्रही सादर केले जाते. अशा विद्यार्थ्यांना पारपत्र काढताना मूळ कागदपत्रे जवळ नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
जन्माचा दाखला, शालान्त परीक्षेचे (दहावीचे) प्रमाणपत्र किंवा पदवीचे प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या मूळ प्रती विद्यार्थ्यांने सध्या शिकत असलेल्या शिक्षणसंस्थेतील प्रवेशाच्या वेळी दिल्या असतील तर त्याने पारपत्रासाठी अर्ज करताना त्या मूळ प्रती सादर केल्या नाहीत तरी चालू शकणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच विद्यार्थ्यांना ही सूट दिली असून, मूळ कागदपत्रांऐवजी कोणती कागदपत्रे सादर करावीत हेही ठरवून दिले आहे.
हा नियम केवळ सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी अर्जदारांसाठी लागू असून त्यासाठी दिलेले सर्व पर्यायी निकष अर्जदाराने पूर्ण करणे गरजेचे आहे, असे प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पारपत्रावर ‘इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड’चा शिक्का मिळण्यासाठी दहावीचे तसेच पदवीचे प्रमाणपत्र लागते. मूळ शैक्षणिक कागदपत्रांऐवजी सादर करायला सांगितलेली कागदपत्रे मिळवणेही सोपे आहे. त्यामुळे या निर्णयाने विद्यार्थ्यांना आणखी दिलासा मिळेल.’’
अनेक विद्यार्थी गावातून शहरात शिक्षणासाठी येतात. पारपत्रासाठी अर्ज करताना ते आपला मूळचा गावातला पत्ता लिहितात. पोलीस चौकशीत मात्र ते सध्या पुण्यात राहात असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत माहिती दडवल्याबद्दल सर्व अर्जदारांना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागत असे. सप्टेंबर २०१४ पासून विद्यार्थ्यांसाठी हा दंडही कमी करून पाचशे रुपये ठेवण्यात आला आहे, असेही गोतसुर्वे यांनी सांगितले.
मूळ कागदपत्रांऐवजी सादर करावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
– ज्या मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेत पारपत्र अर्जदार सध्या शिक्षण घेत आहे त्या शिक्षणसंस्थेकडून अर्जदाराने प्रमाणपत्र आणायचे आहे. अर्जदार त्या शिक्षणसंस्थेचा विद्यार्थी असून, त्याची मूळ शैक्षणिक कागदपत्रे तिथल्या प्रवेशाच्या वेळी अर्जदाराने सादर केली आहेत, असे या प्रमाणपत्रात नमूद केलेले असायला हवे.  
– मूळ प्रमाणपत्र ज्या शिक्षणसंस्थेत सादर केले आहे त्या संस्थेकडून त्या मूळ कागदपत्राची छायांकित व साक्षांकित करून घेतलेली प्रत अर्जदाराने आणायची आहे.
– अर्जदार जिथे सध्या शिकत आहे त्या शिक्षणसंस्थेने त्याला दिलेल्या विद्यार्थी ओळखपत्राची छायांकित प्रत गरजेची आहे.
– अर्जदाराने सादर केलेल्या कोणत्याही पर्यायी कागदपत्राविषयी पारपत्र खात्याला शंका असल्यास पारपत्र खात्यातर्फे संबंधित शिक्षणसंस्थेकडे विचारणा केली जाऊ शकेल, असेही पारपत्र खात्याने स्पष्ट केले आहे.     

Story img Loader