बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून दिलेल्यापैकी व्यावसायिक हेमंत मुलशंकर गांधी (वय ४९, रा. दिल्ली) याला दिल्ली विमानतळावर पकडण्यात आले. त्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात ९१ पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारे काढण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ काढण्यात आली होती. त्याच्या आधारेच गांधीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी याने पुण्यातील रहिवासी असल्याचे एका बँकेचे खाते आणि मनपाकडे कर भरल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. त्या आधाराने त्याने पासपोर्ट काढला होता. या पासपोर्ट वरून गांधी हा हाँगकॉगला मित्राकडे जात असताना दिल्ली विमानतळावर हा बनावट पासपोर्ट असल्याचे समजले. त्यानुसार गांधीला पकडून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले. गांधी हा घडय़ाळ विक्री करणारा व्यावसायिक असून त्याचे कुटुंब दिल्लीत आहे. याप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस. बी. निकम अधिक तपास करीत आहेत.
बंडगार्डन पोलीस ठाण्याचा कर्मचारी दिगंबर लक्ष्मण घोरपडे याने पारपत्र पडताळणी न करताच अनेकांना परवाने दिले असल्याचे प्रकरण २०११ मध्ये उघडकीस आले. त्याचबरोबर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा साथीदार साजीत बाटलीवाला याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यानेही पुण्यातून बनावट पासपोर्ट काढल्याचे उघडकीस आले होते. यानंतर मॉडेल जिया चोपरा, नृत्यांगना वेदिका शिवसागर, अरविंद भट, अभय लोखंडे, रजनिश गुजर, हिनायतअली अब्दुल अजिज हरियान यांना बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट काढल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याचबरोबर जानेवारी २०१४ मध्ये अब्बास मिठाईवाला आणि त्याची पत्नी फरीदा यांना अटक केली आहे. याप्रकरणी ऑगस्ट २०११ साली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये घोरपडे याने ९१ जणांस बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट काढण्यास मदत केल्याचे उघडकीस आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader