पारपत्र काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष भेटीची वेळ मिळण्यासाठी लागणारा कालावधी आता कमी होणार आहे. सध्या सामान्य (नॉर्मल) प्रक्रियेतील पारपत्र अर्जदारांना अर्ज केल्यावर साधारणपणे चाळीस दिवसांनंतरची भेटीची वेळ दिली जाते. आता हा कालावधी अवघा वीस ते पंचवीस दिवसांवर येणार आहे.
भेटीची वेळ लवकर मिळावी यासाठी पारपत्र खात्याने १ मे पासून ३० जूनपर्यंत सलग दोन महिन्यांच्या पारपत्र मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा औंधमध्ये ब्रेमेन मैत्री चौकाजवळील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे सुरू आहे. मेळाव्यात पहिले १५ दिवस प्रतिदिवशी सामान्य प्रक्रियेतील १२५ अर्जदारांना भेटीच्या वेळा मिळतील. त्यानंतर रोजच्या भेटीच्या वेळा देण्याची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊन ती दररोज ६०० अर्जदारांपर्यंत जाईल.
यापूर्वी सामान्य प्रक्रियेतील अर्जदारांना भेटीची वेळ मिळण्यास ५० दिवसांपर्यंत थांबावे लागत होते. सध्या हा कालावधी ३९ ते ४० दिवसांवर आल्याचे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले. गोतसुर्वे म्हणाले, ‘‘पारपत्र काढण्यासाठी असलेली मागणी मोठी असून सातत्याने होत असलेल्या मेळाव्यांमुळे भेटीची वेळ मिळवण्यासाठी थांबावे लागणारे दिवस निम्म्याने कमी होतील. अर्ज केल्यावर २० दिवसात भेटीची वेळ मिळू लागेल. जे लोक या दोन महिन्यांच्या मेळाव्यात अर्ज करतील त्यांना लगेच दोन-तीन दिवसांनंतरची भेटीची वेळ मिळू शकेल. ज्या नागरिकांना मुंढव्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येणे दूर वाटते त्यांच्यासाठी औंधचा मेळावा कदाचित जवळ पडू शकेल.’’
पोलीस चौकशीत लागणाऱ्या वेळाचे काय?
पारपत्र खात्याकडे अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया जरी वेगाने होऊ लागली असली तरी पोलीस चौकशी मात्र वेळखाऊ असल्याची नागरिकांची नेहमीची तक्रार असते. याबाबत गोतसुर्वे म्हणाले, ‘‘ही समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठी पोलीस खात्याबरोबर संपर्कात आहोत. पोलीस ठाण्यांमध्येही पारपत्रासाठीच्या चौकशीसाठी मेळावे घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.’’
अर्ज असा करा
दोन महिन्यांच्या मेळाव्यात पारपत्र काढण्यासाठी नेहमीप्रमाणे अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी http://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची नोंदणी करून अर्ज भरा. अर्जाबरोबर भरावयाचे शुल्क देखील ऑनलाईन भरा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच भेटीची वेळ घेता येईल. अशा प्रकारे ज्या अर्जदारांना भेटीची वेळ मिळाली आहे त्यांना ती वेळ व अर्ज क्रमांक (अप्लिकेशन रेफरन्स नंबर) छापलेली प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन मेळाव्यासाठी यावे लागणार आहे. पुण्यासह सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे नागरिकही या मेळाव्यात अर्ज करू शकतील. मेळाव्याच्या वेळात ‘वॉक इन’, ‘ऑन होल्ड’ आणि ‘तत्काळ’ अर्जदारांना सेवा दिली जाणार नसल्याचे पारपत्र कार्यालयाने कळवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा