पुणे : मक्याचे कणीस सोलण्यासाठी आता यंत्र (कॉर्न पीलिंग मशीन) विकसित करण्यात आले आहे. जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन करून हे यंत्र विकसित केले असून, त्याला एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त झाले आहे. या यंत्राद्वारे प्रति मिनिट दोन किलो कणसे सोलता येणार आहेत.
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील डॉ. आर. डी. खराडकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. अरुण ठाकरे आणि मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी धीरज शहा, पांडुरंग पवार, निलेश पवार आणि छाया बडे यांनी संशोधन करून त्याचे प्रारुप विकसित केले. या यंत्रामुळे मक्याचे कणीस सोलून त्याचे दाणे काढण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. तसेच दाण्यांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकरी, कृषी-प्रक्रिया उद्योजक आणि मका धान्य व्यापाऱ्यांसाठी हे यंत्र अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर उपाय ठरणार आहे. यंत्राद्वारे मक्याचे एक कणीस सोलण्यासाठी दहा ते पंधरा सेकंद लागतात. तर प्रति मिनिटाला दोन किलो कणसे सोलण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे.यंत्राच्या रोलर्ससाठी अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेटेड पॉलिथिलीन मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. तसेच यंत्र दीर्घायुषी आणि लवचिक करण्यात आले आहे. साइड रोलर्सवर चौकोनी आकाराच्या दातांसह मशीन कॉर्न बियांचे नुकसान टाळते. यंत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे.