‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस’च्या (बीव्हीजी- एमईएमएस) १०८ दूरध्वनी क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी विसर्जन मिरवणुकीच्या प्रचंड गर्दीतून १९ रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याची अवघड कामगिरी पार पाडली. विसर्जनकाळात अत्यावश्यक सेवेच्या १५ सुसज्ज रुग्णवाहिका पुण्यात तर ४ रुग्णवाहिका पिंपरी-चिंचवडमध्ये तैनात होत्या. तसेच १२ ठिकाणी गर्दीत जाऊन अत्यावश्यक सेवेची गरज ओळखून तिथेच जागेवर वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘गो टीम्स’ देखील होत्या. एमईएमएसचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. विनय यादव म्हणाले, ‘मिरवणुकीदरम्यान पुण्यात १५ रुग्णांना तर पिंपरी- चिंचवडमध्ये ४ रुग्णांना रुग्णालयात न्यावे लागले. बेशुद्ध पडणे व धडपडल्यामुळे झालेल्या जखमांच्या रुग्णांसह दोन गरोदर स्त्रियांनाही रुग्णवाहिकांनी मदत दिली. तसेच किरकोळ जखमा झालेल्या, उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे अस्वस्थ वाटणाऱ्या व बेशुद्ध पडलेल्या एकूण २० रुग्णांना जागेवरच सेवा देण्यात आली.’ मोरगाव, रांजणगाव आणि थेऊरलाही प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध होती.
अग्निशमन कर्मचारी, जीवरक्षकांचीही तत्परता
अग्निशमन कर्मचारी आणि विसर्जन घाटांवरील कर्मचाऱ्यांची कामगिरीही तत्पर होती. रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता अमृतेश्वर मंदिराजवळ नदीत विसर्जन करणाऱ्या एका गणपती मंडळाची नाव कलंडल्यामुळे काही काळ मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. ६ ते ७ कार्यकर्ते गणपतीच्या मोठय़ा मूर्तीसह विसर्जनासाठी नावेतून नदीत शिरले. वजन अधिक झाल्यामुळे नाव कलंडली आणि दोन जण पाण्यात पडले. अग्निशमन दलाचे कर्मचारी दिगंबर बांदिवडेकर, केंद्र अधिकारी शिवाजी मेमाणे, जीवरक्षक किरण तिकोणे व प्रकाश चौगुले यांनी त्यांना दोर पाण्यात टाकून वर काढल्याची माहिती बांदिवडेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा