सकाळी थंड हवा, दुपारी कडक ऊन आणि अधूनमधून ढगाळ वातावरण अशा विषाणूंना पोषक असलेल्या वातावरणात ‘विषाणूजन्य कंजंक्टिव्हायटिस’ अर्थात डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ‘ऑक्टोबर हीट’मुळे डोळे कोरडे होण्याचा (ड्राय आय) त्रासही रुग्णांमध्ये वाढत्या प्रमाणात बघायला मिळत असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदवले.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून हे दोन्ही आजार विशेषत्वाने दिसू लागले असून त्यातही डोळे कोरडे होण्याची समस्या अधिक असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश मराठे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘कोरडय़ा उष्ण हवेत डोळे कोरडे पडतात आणि अश्रूंची कमतरता भासून डोळ्यांच्या पापण्या एकमेकांवर घासल्या जातात. यामुळे डोळ्यांत काहीतरी टोचल्यासारखे वाटते. डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणेही दिसतात. याला डोळे आले असे म्हणता येत नाही. संगणक, मोबाईल, लॅपटॉप वापरणाऱ्यांमध्ये मुळातच हा प्रकार अधिक दिसून येतो आहे. विषाणूजन्य डोळे येण्याच्या साथीत डोळे लाल होतात आणि डोळ्यातून पातळ पाण्यासारखा द्रवपदार्थ येतो.’
नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘विषाणूजन्य डोळे येण्याचे रुग्ण सध्या दररोज २ ते ३ बघायला मिळत असून एरवी या आजाराचे महिन्यातून १ किंवा २ रुग्ण येत. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेले गॉगल, रुमाल, आय ड्रॉप वापरल्यास हा आजार पसरू शकतो. यात एक डोळा आधी येतो व साधारणत: ३ दिवसांनी दुसरा डोळा येतो. नंतर आलेला डोळा आधी बरा होऊन व आधी आलेला डोळा शेवटी बरा होतो. यात डोळ्याला ‘सुपरअॅडेड’ जीवाणू संसर्गही होऊ शकतो. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांच्यात विषाणूजन्य डोळे आल्यावर जीवाणू संसर्ग होऊन डोळ्यातून चिकट स्त्राव येऊ शकतो.’
काय करावे-
– कोरडे डोळे- स्वच्छ पाण्याने डोळे धुवा, बाहेर जाताना टोपी, गॉगल वापरा, संगणक, मोबाईलचा अनावश्यक अति वापर नको. स्वत:च्या मनाने डोळ्यात टाकण्याची अँटिबायोटिक्स किंवा स्टिरॉईड्सची औषधे घेऊ नका.
– विषाणूजन्य डोळे येणे- हा आजार आपोआप बरा होऊ शकतो, परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता मनाने ‘आय ड्रॉप्स’ टाकू नका, त्यामुळे गुंतागुंती होण्याची शक्यता असते.
– डोळ्यांना विश्रांती देणे व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे.
डोळे येण्याचे रुग्ण वाढले!
सकाळी थंड हवा, दुपारी कडक ऊन आणि अधूनमधून ढगाळ वातावरण अशा विषाणूंना पोषक असलेल्या वातावरणात ...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-10-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient eye october heat