पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आईसोबत आलेल्या रुग्णाने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये रुग्ण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्रकार मंगळवारी घडला.खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे राहणारा ४० वर्षीय रुग्ण मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या आईसमवेत वायसीएम रुग्णालयात आला.

आई केस पेपर काढत असताना रुग्ण इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला व शरीराला गंभीर दुखापत झाली. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांसह पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमी रूग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.रूग्णाने उडी मारण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, रुग्णाला मानसिक आजार असल्याची शक्यता संत तुकारामनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील रुग्ण वायसीएममध्ये

पिंपरी-चिंचवड शहरात ७०० खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह जिजामाता रूग्णालय, थेरगाव रूग्णालय, आकुर्डी आणि भोसरी अशी मोठी रूग्णालये आहेत. याशिवाय आठ प्रसुतीगृहे, २८ दवाखाने, झोपडपट्ट्यांमध्ये २० आरोग्य केंद्र आहेत. आठ कुटुंब नियोजन केंद्र, ३८ लसीकरण केंद्र आहेत. यामार्फत रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. ही सर्वच रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, आंबेगाव व जुन्नर या भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल होत असतात. त्यामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी येत्या काळात मोशीत ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.