मधुमेहाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून कमी वयातही मधुमेह होत असल्याचे आढळून येत आहे. आजमितीला भारतात सात कोटी मधुमेहाचे रुग्ण असून २०३० मध्ये ही संख्या ११ कोटी जाईल, अशी भीती व्यक्त करत मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण, व्यायाम, औषधोपचार व या आजाराविषयीचे पुरेसे ज्ञान अशा चतुसूत्रीचा अवलंब केला पाहिजे, असे आवाहन मधुमेह जागरुकता चळवळीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनु गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
जागतिक मधुमेहदिनानिमित्त लायन्स इंटरनॅशनल व भोसरीतील डॉ. अनुज डायबेटिस केअरच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली, तेव्हा ते बोलत होते. डॉ. दिगंबर ढोकले, डॉ. दीपाली कुलकर्णी उपस्थित होते. १२ नोव्हेंबरला ‘डायबेथॉन’ ही जनजागृतीपर मॅरेथॉन, १३ तारखेला रक्तदान शिबिर, १४ तारखेला डायबेटिस फेस्टिव्हल होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मु. शिंदे उपस्थित राहणार आहेत. भोसरी नाटय़गृहात त्यांच्या हस्ते मधुमेहविषयक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा तसेच स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार होणार आहे.
डॉ. गायकवाड म्हणाले, राज्यात आठ लाख तर पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाखाच्या घरात मधुमेहाचे रुग्ण आहेत. या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे व अधिकाधिक जनजागृतीची गरज आहे. तणावपूर्ण जीवनशैली, आहारातील चुकीच्या गोष्टी, व्यायामाचा अभाव ही आजाराची प्रमुख कारणे आहेत. उशिरा निदान झाल्यास मधुमेहामुळे शरीराची हानी होते. गोड पदार्थ टाळा, ४५ मिनिटे व्यायाम करा, आनंदी राहा, मधुमेहाला शत्रू न मानता मित्रासारखा सांभाळा, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader