सांगवी येथे असलेल्या उरो रूग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुधीर बबन जगताप असे या रूग्णाचे नाव आहे. 24 डिसेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. सुधीर जगतापला दारुचे व्यसन असल्याने त्याला या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्तातील साखर कमी झाली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बबन अचानक धावत सुटला आणि दुसऱ्या मजल्यावरून त्याने उडी मारली. या घटनेत त्याचा पाय जायबंदी झाला आणि त्याच्या चेहेऱ्याला गंभीर दुखापत झाली.
सुधीर जगताप दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न बराच वेळ करत होता. पोलीस आणि अग्निशमन दलालाही याची माहिती देण्यात आली. सुधीर दुसऱ्या मजल्यावर उभा राहिला होता. त्याला पोलिसांनी समजावले, अग्निशमन दलाच्या जवानांनी समजावले पण त्याने कोणचेच ऐकले नाही. त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. ज्यामध्ये त्याचा पाय जायबंदी झाला आहे आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आता पुढील उपचारासांठी सुधीरला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.