रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यापूर्वी रुग्णालयाची, उपचारपद्धतींची आणि डॉक्टरांची पूर्ण माहिती ‘ऑनलाइन’ घेण्यात रुग्ण चोखंदळ झाले आहेत. इतकेच नव्हे तर रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेण्याची वेळही संकेतस्थळावरून निश्चित करण्यात वाढ होऊ लागली आहे. गेल्या चार वर्षांत ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ घेणाऱ्या रुग्णांमध्ये दर महिन्याला एक ते दोन टक्क्य़ांनी तर वर्षांला १२ ते १५ टक्क्य़ांनी वाढ होते आहे.
रुग्ण उपचारांपूर्वी रुग्णालयांच्या संकेतस्थळांवर जाऊन उपचारांचा दर्जा आणि आर्थिक बाजू यांचा तुलनात्मक विचार करू लागले आहेत. या तुलनेदरम्यान पडणारे प्रश्न थेट रुग्णालय व्यवस्थापनालाच विचारण्याचे प्रमाण वाढत आहे.
संचेती रुग्णालयाचे सरव्यवस्थापक डॉ. पंकज चावला म्हणाले, ‘‘दररोज रुग्णालयाकडे किमान पंधरा ते वीस रुग्ण ऑनलाइन चौकशी करतात. यात ७५ टक्के प्रमाण स्थानिक रुग्णांचे तर २० ते २५ टक्के प्रमाण परदेशी रुग्णांचे आहे. चौकशी करणाऱ्या रुग्णांपैकी जवळजवळ ९० टक्के स्थानिक रुग्ण प्रत्यक्ष उपचारांसाठी येतात. रुग्णांचा ऑनलाइन वावर वाढल्यामुळे रुग्णालयाचे संकेतस्थळ अधिकाधिक आधुनिक आणि माहितीपूर्ण कसे बनवता येईल यावर आम्ही भर देत आहोत.’’
रुग्णांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांना नोंदणी फी माफ करण्यासारख्या सवलतीही काही रुग्णालये देत आहेत. खराडीतील कोलंबिया एशिया रुग्णालय नवीन असताना रुग्णांना ही सवलत देण्यात आली होती. रुग्णालयाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील राव म्हणाले, ‘‘रुग्णालय नवीन असतानाही ऑनलाइन चौकशी करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती. त्यानंतर ती सतत वाढते आहे. यात प्लास्टिक सर्जरी, लठ्ठपणासाठी केली जाणारी बॅरिअॅट्रिक सर्जरी अशा उपचारांसाठी चौकशी करणारे रुग्ण अधिक आहेत.’’
रुग्णालयांचीही मोबाइल ‘अॅप्स’
हल्ली मोबाइल प्रत्येकाच्या हातात खेळत असल्याने रुग्णालयाचा ‘सर्च’ मोबाइलवरूनही होऊ लागला आहे. हे काम सुलभ करण्यासाठी रुग्णालये आपली स्वतंत्र अॅप्लिकेशन्स बाजारात आणत आहेत. रुबी हॉल क्लिनिकतर्फे मे महिन्यात अॅड्रॉइड फोनसाठी एक ‘अॅप’ सादर करण्यात आले. रुग्णालयाच्या आयटी विभागाचे सरव्यवस्थापक आनंद पाटील म्हणाले, ‘‘रुग्णालयाचे अॅप बाजारात आल्यापासून तीनच महिन्यांत सातशेहून अधिक जणांनी ते डाउनलोड केले आहे. जूनच्या अखेरीस याच अॅपचे आयपॅडसाठीचे व्हर्जन सादर करण्यात आले. त्यालाही दोनशेहून अधिक डाऊनलोड्स मिळाले. या अॅपमुळे रुग्णालय, तेथे मिळणारे उपचार आणि डॉक्टर्स यांची माहिती शोधणे सोपे झाल्यामुळे स्थानिकांसह परदेशी रुग्णही अॅप डाऊनलोड करत असल्याचे दिसून आले आहे. परदेशी रुग्णांना ‘मेडिकल टूरिझम’शी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या अॅपचा उपयोग होतो. अॅपव्यतिरिक्त संकेतस्थळावरून चौकशी करणाऱ्या रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के स्थानिक रुग्ण तर १० ते १५ टक्के परदेशी रुग्ण प्रत्यक्ष उपचारांसाठी येतात.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा