लक्षणांसह करोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये दीर्घकाळपर्यंत मानसिक अस्वास्थ्याचे प्रश्न, जगण्याबाबत असमाधान आणि नैराश्य अशी लक्षणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे काळ पुढे गेला तसा त्यात फारसा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही, उलट नैराश्य, भीती, चिडचिड, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे कायम राहिल्याचेच ‘द लॅन्सेट सायकियाट्री’ या नियतकालिकाने आपल्या शोधनिबंधात नमूद केले आहे.

हेही वाचा >>>दिवाळीआधी पावसाची सुटी

किंग्ज कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या दोन संस्थांमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर हा शोधनिबंध आधारलेला आहे. करोना काळात लक्षणांसह संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये मानसिक आरोग्यावर झालेले परिणाम या दोन गोष्टींचा सहसंबंध उलगडण्याचा प्रयत्न या शोधनिबंधात करण्यात आला आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत करोना संसर्ग होऊन गेलेल्या सुमारे ५४,४४२ रुग्णांच्या अभ्यासातून हा शोधनिबंध साकारण्यात आला आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील मानसिक आजाराची लक्षणे ही काळाबरोबर कमी होण्याऐवजी त्याचे खोलवर परिणाम या रुग्णांवर होताना दिसत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. विविध वयोगटातील, विविध वंशांच्या आणि सामाजिक तसेच आर्थिक गटांतील महिला आणि पुरुषांमध्ये ही लक्षणे दिसून आली आहेत. यापूर्वीच्या संशोधनांतून प्रामुख्याने महिला आणि २५-४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर करोनाचे परिणाम अधिक गंभीर असल्याचे दिसून आले होते, मात्र लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध या समजाला छेद देणारा असून करोनानंतर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न बळावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे.

हेही वाचा >>> पुणे: जिल्ह्यात ७५ जणांना नव्याने करोना संसर्ग

साथरोगाच्या अत्यंत सुरुवातीच्या काळात काही रुग्णांमध्ये झालेला करोना संसर्ग त्यांना दीर्घकाळापर्यंत मानसिक अस्वास्थ्य देणारा ठरला आहे. यामागील कारणे शोधणे हे भविष्यातील संभाव्य महासाथींच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा दावा लॅन्सेटकडून करण्यात आला आहे. युकेमध्ये स्थायिक असलेल्या जवळजवळ सर्वच वंशांच्या लोकसंख्येमध्ये करोना आणि मानसिक अस्वास्थ्याचा जवळचा संबंध आढळल्याने जागतिक स्तरावरील स्वतंत्र आढावा घेतल्यास त्यातून आणखी कितीतरी प्रश्न अधोरेखित होण्याची शक्यताही या संशोधनातून वर्तवण्यात आली आहे.

Story img Loader