पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालय म्हटले, की रुग्णांच्या लांबच लांब रांगा असे चित्र नेहमी दिसते. अनेक वेळा रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे दिसते. ससून रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील (OPD) ही परिस्थिती आता बदलणार आहे. या विभागाचे नूतनीकरण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना जलद सेवा मिळणार आहे.
ससून रुग्णालयात पुण्यासोबत राज्यातील रुग्ण येतात. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज सुमारे तीन हजार रुग्ण येतात. रुग्णालयातील ओपीडीत दररोज तब्बल तीन हजार रुग्णांची तपासणी केली जाते. ससून रुग्णालयात मोफत अथवा अतिशय कमी दरात उपचार होत असल्याने रुग्णांची संख्या मोठी असते. यामुळे ओपीडीतील गर्दीही नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे रुग्णांना तासन् तास ताटकळावे लागते. यामुळे ओपीडीचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
हेही वाचा… भारताच्या कोळंबीची अमेरिका, चीनला चटक
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील ओपीडी ५७ हजार ६१९ चौरस फुटांची आहे. मुख्य बाह्य रुग्ण कक्ष, सर्जिकल स्टोअर, वॉर्ड क्रमांक १, १९ आणि १६ चे नूतनीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर रक्तपेढीचीही सुधारणा केली जाणार आहे. प्रसाधनगृहेही अद्ययावत केली जाणार आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सुसह्य वाटेल असे वातावरण ओपीडीमध्ये तयार केले जाणार आहे.
हेही वाचा… पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज
याबाबत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, की रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार व्हावेत आणि त्यांच्या इतर तपासण्या व्हाव्यात, असे नियोजन आहे. त्यामुळे ओपीडीचे नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणानंतर रुग्णांची केस पेपर काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी आणि तपासण्यांसाठी विविध विभागांत होणारी धावपळ कमी होईल. हे सर्व विभाग शेजारी शेजारी असतील. ओपीडीशी निगडित सेवांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना जलद सेवा देणे शक्य होईल.
गर्भवतींचा त्रास कमी होणार
सध्या ससून रुग्णालयात गर्भवती महिलांना तपासणीसाठी मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जावे लागते. त्यामुळे त्यांची दमछाक होते. त्यामुळे स्त्रीरोग विभाग तळमजल्यावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे गर्भवतींची तपासणी तळमजल्यावरच होईल. त्यामुळे तपासणीसाठी पहिल्या मजल्यावर जाण्याचा त्यांचा त्रास कमी होणार आहे.
“ससून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाचे नूतनीकरण करताना रुग्णांना एकत्रित सेवा देता याव्यात, हा विचार करण्यात आला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. कमी जागेत जास्तीत जास्त सेवा रुग्णांना देता याव्यात, असा उद्देश आहे.” – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय