पुण्यातल्या खवय्यांच्या विश्वात अनेक गोष्टींची समीकरणं कशी एकदम घट्ट जुळलेली आहेत. म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थाचं नाव जरी नुसतं कोणी उच्चारलं तरी तो पदार्थ कुठे मिळतो, याचं उत्तर चटकन दिलं जातं. पॅटिस म्हटलं की पूना बेकरी हे असंच एक समीकरण. वास्तविक, हा तसा बेकरीजन्य पदार्थ. हा काही हॉटेलांमध्ये मिळणारा पदार्थ नाही, पण जोगेश्वरी चौकाजवळ असलेल्या न्यू पूना बेकरीत जाऊन तिथले गरम गरम पॅटिस आणि इतरही काही पदार्थ खाणं, यातला आनंद हॉटेलमध्ये जाऊन एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेण्याइतका नक्कीच आहे. हा अनुभव गेली किमान चाळीस-पन्नास वर्ष खवय्ये घेत आहेत.
न्यू पूना बेकरीचा इतिहास रंजक आहे. खवय्यांच्या जिभेवर हे नाव गेली तब्बल एकोणसाठ वर्ष टिकून आहे आणि त्यातूनच या बेकरीचं यश लक्षात यावं. रामभाऊ गिरमकर हे मूळचे दौंड तालुक्यातले. घरची थोडीफार शेती. पण शेतीत भागेना. म्हणून हे कुटुंब पुण्याला आलं. अर्थात पुण्यात येऊन काय करायचं, हा प्रश्न रामभाऊंसमोर होताच. मिळतील ती कामं त्यांनी सुरू केली. हमाली काम करताना त्यांना वेगवेगळ्या दुकानांमध्ये तेला-तुपाचे डबे पोहोचवण्याचं काम मिळू लागलं. लष्कर भागात असलेल्या पाश्चर बेकरीतही ते तेला-तुपाचे डबे पोहोचवत असतं. तिथे राबता वाढला आणि बेकरीच्या कामाची उत्सुकता रामभाऊंच्या मनात निर्माण झाली. मग दिवसा अशी मिळतील ती कामं आणि रात्री पाश्चर बेकरीत काम असा दिनक्रम सुरू झाला. कष्टाची तयारी होतीच. त्याला बेकरीतल्या कामाच्या थोडय़ा अनुभवाची जोड मिळाली आणि रामभाऊ गिरमकरांनी १९५९ मध्ये स्वत:च्या हिमतीवर रास्ता पेठेत छोटय़ा जागेत स्वत:ची बेकरी सुरू केली. पुढे हीच बेकरी जोगेश्वरी समोरच्या सध्याच्या मोठय़ा जागेत सुरू झाली. रामभाऊंचे पुत्र भूषण यांनी आई-वडिलांचा हा वारसा समर्थपणे फक्त सांभाळलेलाच नाही तर त्यांनी या चविष्ट उद्योगाचा खूप मोठा विस्तारही गेल्या काही वर्षांत केला. त्यांचे कुणाल आणि कुशल हे दोन्ही मुलगे आता याच व्यवसायात असून वाकड येथील चाळीस हजार चौरस फूट जागेत उभारलेल्या कारखान्यात बेकरीतील सर्व उत्पादने तयार होतात.
व्हेज पॅटिस हे न्यू पूना बेकरीचं खास वैशिष्टय़ं. या बेकरीत आपण कधीही गेलो तरी तिथे पाच-सातजण पॅटिसचा आस्वाद घेताना दिसतातच. अर्थात ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार करण्यात आलेले बदल हेही या बेकरीचं जाणवणारं ठळक वेगळेपण. पूर्वी पॅटिस फक्त रविवारी मिळायचे आणि रविवारी बेकरी उघडण्याच्या आधीच बेकरीच्या बाहेर सकाळी पॅटिस घ्यायला आलेल्यांची रांग लागलेली असायची. नंतर आठवडय़ातून आणखी एक-दोन दिवस पॅटिस मिळायला लागले आणि त्यानंतर ते रोज मिळायला लागले. तसे नेहमी बेकरीत जे पदार्थ मिळतात ते म्हणजे पाव, खारी वगैरे असे पदार्थ इथे पूर्वी मिळायचे. हळूहळू खूप बदल होत गेले. जुन्या अनेक उत्पादनांना नवीन खाद्यपदार्थाची जोड मिळाली आणि सध्या या बेकरीच्या एकूण उत्पादनांची संख्या २४० वर गेल्याचं भूषण गिरमकर सांगत होते. पुण्यात सध्या या बेकरीच्या शाखांची संख्या नव्वदपर्यंत गेली आहे.
पॅटिस हा काही फक्त इथेच मिळणारा पदार्थ नाही. मात्र इथल्या पॅटिसचं वैशिष्टय़ं हे आहे की त्यांचा आकार, चव म्हणजे एकुणातच दर्जात जराही कधी बदल होत नाही. पॅटिस किंचित तिखट असले तरी जळजळीत नसतात. नेहमी गरम, कुरकुरीत, खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट असे या बेकरीचे पॅटिस असतात. त्याच्या आतमध्ये असलेली बटाटय़ाची भाजीदेखील खास चवीची. कधी बटाटा कच्चा आहे किंवा कधी भाजी कमी आहे, पॅटिस तेलकट आहेत, असा प्रकार या पॅटिसबाबत कधीच होत नाही. या पॅटिसमध्येही आता खूप प्रकार इथे मिळतात. व्हेज पॅटिस, व्हेज चिज जैन पॅटिस, कॉर्न जैन पॅटिस, नूडल्स, मंचुरियन, मशरुम मसाला पॅटिस यातील कोणताही प्रकार कधीही घेतला तरी पदार्थ दर्जेदार मिळणार यात शंकाच नाही. जशी पॅटिसची चव तशीच इतरही सर्व पदार्थाची चव कधी बदलत नाही. व्हॅनिला, चॉकलेट, मँगो, स्ट्रॉबेरी या स्वादांचे क्रिमरोल असोत किंवा पट्टी सामोसा वा पंजाबी सामोसा असो. या सगळ्याच गोष्टी एकदम मस्त अशाच. साधे टोस्ट, मिल्क फ्रुट टोस्ट, स्पेशल टोस्ट, ब्रेड स्टिक, गार्लिक स्टिक, स्पेशल बटर, जीरा बटर, मसाला बटर, इलायची बटर, कुरकुरीत खारी, माखन खारी, चीज खारी, मसाला खारी, जीरा खारी.. इथल्या वैशिष्टय़ांची ही यादी आणखीही खूप लांबू शकते. या बेकरीत मिळणाऱ्या पावांमधील विविध प्रकार देखील खूप प्रसिद्ध आहेत. विशेषत: नेहमीचा स्लाइस ब्रेड, लादी पाव आणि इतर अनेक प्रकारचे पाव ही या बेकरीची खासियत आहे. शिवाय इतरही अनेक उत्पादनं इथे मिळतात.
पुणेकर खवय्यांच्या पसंतीला उतरणं हे तसं सोपं काम नाही. पण पंचावन्न वर्षांहून अधिक काळ या बेकरीचा लौकिक टिकून तर आहेच, शिवाय वाढतही आहे. भूषण गिरमकर यांना एकदा म्हटलं, हे कसं शक्य झालं. त्यावर ते म्हणाले की, पुणेकर ग्राहकांचा जो चोखंदळपणा आहे त्याचा आम्ही नेहमी आदर केला. त्यांच्याकडून आलेली एखादी छोटीशी सूचनासुद्धा आम्ही कधी दुर्लक्षित केली नाही.
एकुणात खवय्यांच्या सन्मानाचंच हे उदाहरण म्हटलं पाहिजे.
न्यू पूना बेकरी
कुठे आहे –
तांबडी, जोगेश्वरी चौकाजवळ
सकाळी सात ते रात्री नऊ