पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या कामास गेल्या १२ वर्षांपासून स्थगिती होती. प्रकल्पासाठीचे लोखंडी पाइप व यंत्रसामग्री मावळ तालुक्यातील खासगी जागेत ठेवण्यात आले असून, त्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. मागील साडेचार वर्षांतील पाइप ठेवण्याचे भाडे आणि सुरक्षारक्षकांसाठी सात कोटी ६८ लाख २४ हजार ५९७ खर्च जुन्या ठेकेदाराला दिला जाणार आहे.
हेही वाचा – पुणे : विधानसभेसाठी ठाकरे गटाची तयारी; ‘या’ चार माजी नगरसेवकांवर जबाबदारी
पवना धरण ते निगडीतील पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प महापालिकेने २००८ मध्ये हाती घेतला होता. ठेकेदाराला ३० एप्रिल २००८ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. कामाची मुदत दोन वर्षे म्हणजे २९ एप्रिल २०१० पर्यंत होती. काम सुरू असताना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात पोलीस गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून काम बंद आहे. शासनाने नुकतीच प्रकल्पावरील स्थगिती उठविली आहे. आतापर्यंत केवळ १२.६२ टक्के काम झाले आहे. या कामास ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.