पिंपरी : मागील पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी रात्रीपासून जोरात हजेरी लावली आहे. मावळसह पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून १४०० क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरले आहे. वीज निर्मिती ग्रहाद्वारे पवना नदीमध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी साडे नऊ वाजता ८०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. हा विसर्ग बारा वाजता १४०० क्यूसेक्स करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : दक्षिण कोरियात नृत्य शिकण्यासाठी शाळकरी मुली घरातून पसार; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलींचा शोध
पवना नदी काठच्या सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठची शेतीची अवजारे, जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.