पिंपरी : मागील चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ४९.३० टक्के म्हणजे निम्मे भरले आहे. पुढील सहा महिने पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मात्र, महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. मागील चार दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. १ जूनपासून धरण परिसरात १०७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ३१.८७ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ४९.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, आता शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा…पुण्यातील बिबटे जाणार गुजरातला
साडेचार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. काही दिवसांसाठीची पाणीकपात महापालिका प्रशानाने अनिश्चित काळासाठी कायम ठेवली. साडेचार वर्षे झाले, तरी पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. दररोज पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. दुसरीकडे एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. पाण्याच्या तक्रारींच्या संख्येत देखील घट झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.