लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवायीयांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना नदीत पाणी सोडून महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून उचलते. निगडी, प्राधिकरणातील जल शुध्दीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. तेथून शहरात वितरित केले जाते. सध्या शहराला पवना ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला गेल्या साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
पावसाने ओढ दिल्याने जूनमध्ये धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. जून महिना कोरडा गेल्याने पाणी कपातीचे संकट ओढवले होते. जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत गेली. आठवडाभर पाऊस झाला. धरणात २३ जुलैला ५० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतरही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तीन वेळा धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला.
दोन हजार ६११ मिमी पावसाची नोंद
पवना धरण दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी शंभर टक्के भरत असते. यंदा मात्र धरणातून तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरण्यास २५ ऑगस्ट उजाडले. जून महिन्यांपासून धरण परिसरात २६११ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २४ ऑगस्टअखेर २१६९ मिली मीटर पाऊस झाला हाेता.
आणखी वाचा-पुणे: अग्निशमन दलाकडून मुठा नदीपात्रात अडकलेल्या दोघांची सुटका
धरणातून विसर्ग सुरू, प्रशासन सतर्क
पिंपरी-चिंचवड शहर आणि धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही केले आहे.