गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या मावळमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पिंपरी- चिंचवडसह मावळकरांचा यावर्षीचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. सध्या पवना धरणातून ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी- चिंचवड आणि मावळकरांना वरून राजाने गेल्या २४ तासांत झोडपून काढले आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकर आणि मावळ यांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरल्याने वीज निर्मिती गृहद्वारे सकाळी सहा वाजल्यापासून १४०० क्यूसेक तर सकाळी आठ वाजल्यापासून पवना धरणाच्या सांडव्यावरून २१०० क्यूसेक असे एकूण तीन हजार पाचशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे : उत्साह दहीहंडीचा, उच्चांक ध्वनिप्रदूषणाचा!
हेही वाचा – तृतीयपंथीच्या दहीहंडीला पुणेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने मावळमधील बळीराजादेखील सुखावला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे मावळमधील भात शेती संकटात सापडली होती. परंतु, पुन्हा वरून राजा कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंद आहे.