पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील १५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळमधील गावे आणि शेतीला पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणाचे काम १९७२ मध्ये पूर्ण झाले. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे धरणातील पाणी साठवणक्षमता कमी झाली होती. त्यामुळे खासदार बारणे यांनी पुढाकार घेत गाळ काढण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>> पुणे: कर्ज बुडव्यांबाबतचे रिझर्व्ह बँकेचे धोरण बँकांसाठी घातक
गेल्या सात वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात धरणातील गाळ काढला जातो. या वर्षी आतापर्यंत १५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. या धरणातून आतापर्यंत ७६ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील साठवणक्षमतेत वाढ झाली आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, की पावसाळ्यात पवना धरणात आजूबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात गाळ येतो. त्यामुळे धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. शासकीय यंत्रणेची मदत न घेता सामाजिक संस्था, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने गाळ काढला जात आहे. मागील सात वर्षांत धरणातून ७६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे.