पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. शहरातील बंद केलेले जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत. पाणीबचतीची चांगली सवय लावण्यासाठी एक वेळ पाणीपुरवठय़ाचेच धोरण कायम ठेवावे, असा पालिका प्रशासनाचा विचार असून अंतिम निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत होणार आहे.
पावसाने दडी मारल्याने महिन्यापूर्वी चिंता निर्माण झाली असताना नंतरच्या काळातील समाधानकारक पावसाने दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळी ९९.५० टक्के धरण भरले होते. प्रशासनाने आता पाणीकपातीचा फेरविचार सुरू केला आहे. पूर्वीप्रमाणे दोन वेळ पाणीपुरवठा ठेवायचा की, एक वेळ पाणीपुरवठय़ाचे धोरण कायम ठेवायचे, याविषयी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. पालिका सभेत नगरसेवकांनी दोन्ही बाजूने मते मांडली होती. प्रशासन एक वेळ पाणी ठेवण्यासाठी आग्रही आहे. तथापि, लोकप्रतिनिधींची सहमती आवश्यक आहे. पाणीकपातीचे धोरण म्हणून बंद केलेले १० तलाव पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. क्रीडा समितीचे सभापती जितेंद्र ननावरे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी त्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता.