पिंपरी : शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी असे चार दिवस पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे. ही जत्रा सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे. जत्रेत ७५० बचत गट सहभागी होणार आहेत.
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत दर वर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. त्याला शहरातून विक्रमी प्रतिसाद मिळतो. शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार व्हाव्यात या हेतूने हा उपक्रम आयोजित केला जातो. दर वर्षीप्रमाणे ही जत्रा सांगवी येथे भरणार आहे. त्यात एकूण ७५० स्टॉल असणार आहेत. त्यात विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तू, तसेच, शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. लकी ड्रॉ काढून बचत गटांना स्टॉलचे वितरण करण्यात आले. विविध योजना-प्रकल्पांची माहिती, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास, स्वच्छ भारत अभियान असे विविध प्रकारचे महापालिकेचेही स्टॉल असतात. स्टॉल, मंडपउभारणी, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, स्वच्छता व इतर सेवासुविधांसाठी एक कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
या जत्रेमध्ये ७५० बचत गटांना ‘लकी ड्रॉ’ द्वारे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये दिव्यांग, तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल राखीव आहेत’, अशी माहिती सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.