पिंपरी : शहरी आणि ग्रामीण संस्कृतीने नटलेल्या चार दिवसीय पवनाथडी जत्रेचा सोमवारी समारोप झाला. १७ वर्षांची परंपरा अबाधित ठेवत यावर्षीही महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेस नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावर्षी सुमारे ४ ते ५ लाख लोकांनी पवनाथडी जत्रेस भेट देऊन विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, वस्तू खरेदी केल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच सर्व सहभागी बचत गटांची सुमारे १.५ ते १.२५ कोटी रुपयांची उलाढाल या पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून झाली, अशी माहिती समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्ये विकसित व्हावी तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या पवनाथडी जत्रेचा समारोप झाला.
महिला, तृतीयपंथी आणि दिव्यांग बचत गटांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान
बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे ३८६ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थांचे २१७ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १३० तसेच दिव्यांग बचतगटांना ०५, सामाजिक संस्था १४, तृतीयपंथी बचतगट ०४ असे एकूण ७५६ स्टॉल पवनाथडी जत्रेमध्ये होते. सोडत पद्धतीने स्टॉल वाटप करताना काही महिलांच्या हाती काढण्यात आलेल्या चिट्ठीत त्यांचाच नंबर निघाला होता. या महिला बचत गटांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नानाश्री महिला बचत गट, ब्राईट महिला बचत गट, नवीन परिवर्तन महिला बचत गट, अश्विनी स्वयंसिद्धा महिला बचत गट, केजीएम महिला बचत गट, शिवसंगमेश्वर महिला बचत गट यांचा समावेश होता. तसेच यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तृतीयपंथी, दिव्यांग बचत गट आणि जनरल, शाकाहारी, मांसाहारी स्टॉलधारक महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला.
पवनाथडीच्या माध्यमातून सक्षमा उपक्रमात महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्यावर भर
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षमा प्रकल्प राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत ५,००० महिला बचत गटांना कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या २,५५६ बचत गट या प्रशिक्षणाचा लाभ घेत असून महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प महत्वांकाक्षी ठरत आहे. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेमध्ये माहिती कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षाच्या आधारे आणखी महिला या सक्षमा प्रकल्पाशी जोडल्या गेल्या आहेत.
पिंक ई-रिक्षा योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभारण्यात आला होता स्वतंत्र स्टॉल महाराष्ट्र शासनाच्या पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देता यावा यासाठी स्वतंत्र स्टॉल या जत्रेमध्ये उभारण्यात आला होता. या स्टॉलच्या माध्यमातून महिलांना या योजनेबद्दल माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत, महिलांना महिला व बालकल्याण विभागामार्फत पिंक ई-रिक्षा प्रदान करण्यात येणार असून अनेक महिलांनी या स्टॉलला भेट देऊन योजनेची माहिती जाणून घेतली. समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी नृत्य नाट्य आणि संगीताचा त्रिवेणी संगम असलेला जगतसुंदरी हा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी पवनाथडी जत्रेत सहभागी झालेल्या ७५० पेक्षा जास्त महिला बचत गटांना तसेच जत्रेमध्ये सहकार्य करणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.