पिंपरी पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेचे ठिकाण यापुढे फक्त पिंपरीतील एचए कंपनीचे मैदान हेच राहील आणि डिसेंबर ते जानेवारी याच कालावधीत त्याचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा महापौर मोहिनी लांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. सत्ताधारी नेत्यांच्या दबावामुळेच आतापर्यंत वेगवेगळ्या भागात पवनाथडीचे आयोजन होत होते. तथापि, महापौरांच्या घोषणेमुळे यापुढे तरी पवनानथडीचा ‘फुटबॉल’ होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरूवारी (४ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता पवनाथडीचे उद्घाटन होणार आहे. ७ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री १० चालणाऱ्या पवनाथडीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, व्याख्याने होणार आहेत. बचत गटांसाठी ३५० स्टॉल असून सुमारे ५९२ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, कोणालाही वंचित ठेवणार नाही, सर्वाना स्टॉल उपलब्ध करून दिले जातील, असे महापौरांनी स्पष्ट केले. या वेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती भारती फरांदे, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, विधी समितीचे सभापती प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या,‘‘निविदा काढण्यासाठी उशीर झाल्याने यंदा पवनाथडीला खूपच उशीर झाला, त्यामुळे वेळही चुकली आहे. मात्र, यापुढे असे होणार नाही. डिसेंबर अथवा जानेवारी हाच कालावधी पवनाथडीसाठी योग्य असून त्याची तारीखही निश्चित केली जाईल. कोणाच्या मतदारसंघात अथवा प्रभागात पवनाथडी आयोजित करण्याचा प्रश्न यापुढे होणार नाही. एचएच्या मैदानावर प्रशस्त जागा असल्याने तेथेच पवनाथडी होईल, त्यात बदल होणार नाही.’’ असे महापौरांनी स्पष्ट केले. पवनाथडीसाठी ४० लाख रूपये तरतूद असल्याचे सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ मिळावी, यासाठी पवनाथडीचा उपयोग होईल, असा विश्वास फरांदे यांनी व्यक्त केला.
पवनाथडी जत्रा यापुढे फक्त पिंपरीतच – महापौर
पिंपरी पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेचे ठिकाण यापुढे फक्त पिंपरीतील एचए कंपनीचे मैदान हेच राहील आणि डिसेंबर ते जानेवारी याच कालावधीत त्याचे आयोजन करण्यात येईल.
आणखी वाचा
First published on: 03-04-2013 at 01:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawana thadi jatra now will be only in pimpri