सामान्य जनमानसात काम करणारा कार्यकर्ता अशी माझी गेल्या पंचवीस वर्षांपासूनची ओळख आहे. तर पार्थ पवारची ओळख अजित पवार यांचा मुलगा अशी आहे. त्यामनिवडून येऊ की नाही ही भीती पवारांना असल्याने ते बॅनरवर आणि फ्लेक्सवर झळकतात, असा टोला मावळचे खासदार आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांनी पवार कुटुंबियांना लगावला आहे.
मावळ भागात फ्लेक्सवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यासह पार्थ पवार यांचे फोटो झळकले आहेत. याबाबत पत्रकारांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावर प्रतिक्रिया देताना बारणे म्हणाले, जनमानसात काम करणारा सामान्य कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे. त्यामुळे पार्थ पवार कोण? याला मी महत्व देत नाही. गेल्या २५ वर्षांपासून माझ्या कामांमधून मी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघातील नागरिक योग्य निर्णय घेतील.
मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार आला की दुसरा कोणता पवार आला मला त्याचा फरक पडत नाही. कारण, जनमानसात स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण करुन आणि विकासाच्या जोरावर निवडणूक लढवल्या जातात. त्यामुळे आपण निवडणून येऊ की नाही याची भीती पवारांना वाटत असल्याने त्यांना बॅनर आणि फ्लेक्सवर झळकावं लागतं. मला निवडणूकीची भिती वाटत नाही. त्यामुळे २०१९ च्या मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हाच शिवसेना उमेदवार म्हणून तुमच्यासमोर असेल, असा विश्वास बारणे यांनी पत्रकारांनी बोलताना व्यक्त केला.