पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्यानंतर आता दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. मात्र, महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. १ जूनपासून धरण परिसरात एक हजार ९७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ७५ टक्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ९३.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त पाऊस झाला.
हेही वाचा – देशात तीन दशकांमध्ये १३७७ वाघांची शिकार! वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
धरणात ९३.६४ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, दररोज पाणीपुरवठा केल्यास चढावरील भागात पाणी जात नाही. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सर्वांना समान पाणी मिळत आहे. त्यामुळे दिवसाआडच पाणी पुरवठ्यावर प्रशासन ठाम आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठ्यासाठी शहरवासीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत धरण १०० टक्के राहिल्यानंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. दरम्यान, समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेतीन वर्षे झालीत तरी पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.
दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पवना धरण भरले असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शहरावर लादलेली पाणीकपात रद्द करून दररोज पाणीपुरवठा करावा. – सीमा सावळे, माजी नगरसेविका
हेही वाचा – नागपूर : मेडिकलमध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार
प्रशासन व पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी, नियोजन शून्य व भोंगळ कारभारामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असतानादेखील टँकर लॉबीला फायदा व्हावा. या हेतूने महापालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणीचे कारण देत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे. धरणात मुबलक साठा झाल्याने आता दररोज पाणीपुरवठा सुरू करावा. – नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते
एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत आहे. पाण्याच्या तक्रारींच्या संख्येत घट आहे. त्यामुळे दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहील. – श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका