संपूर्ण शहरात दुचाकींसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत बुधवारी बहुमताने फेटाळण्यात आला. काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि आरपीआय या तीन पक्षांच्या गटनेत्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध करून दुचाकींसाठी ही योजना नको अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्दय़ावर एकाकी पडली.
चार चाकींप्रमाणेच शहरात दुचाकी वाहनांनाही पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू करावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पक्षनेत्यांपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. यापूर्वीही असाच प्रस्ताव प्रशासनाकडून आणण्यात आला होता. मात्र, संपूर्ण शहरातून प्रस्तावाला जोरदार विरोध झाल्यानंतर अखेर दुचाकींना पे अ‍ॅन्ड पार्क योजनेतून वगळावे, असा आदेश मुख्य सभेत तत्कालीन महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिला होता. हा प्रस्ताव मुख्य सभेने फेटाळल्यानंतरही पुन्हा तशाच प्रकारचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता.
हा प्रस्ताव बुधवारी पक्षनेत्यांपुढे निर्णयासाठी आल्यानंतर प्रस्तावाला विरोधी पक्षनेता, मनसेचे वसंत मोरे, काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ आणि आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी जोरदार विरोध केला. वाहतूक ही शहरातील गंभीर समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी कोणतेही ठोस उपाय न करता फक्त दुचाकींसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू करणे योग्य ठरणार नाही. अशा प्रकारे सर्व रस्त्यांवर पे अ‍ॅन्ड पार्कचा दुचाकीधारकांना भरुदड पडल्यास त्यातून संपूर्ण शहरात नव्या समस्या उद्भवतील. त्यातून गुन्हेगारी वाढेल, आदी हरकती या वेळी गटनेत्यांनी घेतल्या.
शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी काय उपाय करणार त्याच्या योजना व तसे प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार करावेत व ते पक्षनेत्यांपुढे मांडावेत, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षनेत्यांनी पे अ‍ॅन्ड पार्कला विरोध केल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्तावाबाबत एकाकी पडली. अन्य पक्षांनी कोणत्याही परिस्थितीत शहरात दुचाकींसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू करू नये, अशी ठाम भूमिका घेत प्रस्ताव बहुमताने फेटाळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा