नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या धोरणाचे पुढचे पाऊल म्हणून महावितरण कंपनीने मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या वापरातून ग्राहकांना आता मोबाईलच्या माध्यमातून आपले वीजबिल पाहता येणार असून, त्याचा भरणाही करता येणार आहे. त्याचप्रमाणे या अॅपच्या माध्यमातून वीजसेवांबाबत तक्रार व सूचनाही नोंदविता येणार आहेत.
महावितरण कंपनीच्या माहिती-तंत्रज्ञान विभागानेच विकसित केलेल्या या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांचा वेळ वाचविण्याच्या दृष्टीने वीजबिल भरणा करण्याचा आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. महावितरण कंपनीच्या http://www.mahadiscom.inया अधिकृत संकेतस्थळावरून त्याचप्रमाणे ‘गुगल प्ले स्टोअर’ च्या माध्यमातूनही हे अॅप डाऊललोड करता येणार आहे. संकेतस्थळावर संबंधित मोबाईल अॅप वापरण्याची पद्धत व वेगवेगळ्या सुविधांसाठी करावयाच्या प्रक्रियेचीही माहिती देण्यात आली आहे.
ग्राहकाने महावितरणचे मोबाईल अॅप घेतल्यास त्याला प्रत्येक महिन्याचे वीजबिल त्यात पाहता येईल. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून वीजबिलाचा भरणाही करता येणार आहे. त्याबाबतच्या सूचना संकेतस्थळावर किंवा अॅपमध्येही ग्राहकांना पहायला मिळतील. संबंधित अॅपमध्ये ग्राहकांना वीजसेवेबाबत तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या वीजबिलावरील ग्राहक क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. या तक्रारीची पोचही ग्राहकांना देण्यात येणार असून, त्याबाबतचा एसएमएस ग्राहकांना पाठवला जाईल.
वीजसेवेबाबत तक्रार नोंदविण्यासाठी महावितरण कंपनीचे २४ तास सुरू असलेले १८००-२३३-३४३५, १८००-२००-३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक आहेत. अॅपच्या माध्यमातून या चोल फ्री क्रमांकावरही संपर्क करता येणार आहे. महावितरण कंपनीशी संबंधित विविध सेवांची माहिती जाणून घेण्यासाठी चौकशी किंवा सुविधांबाबत सूचना करण्याची व्यवस्थाही अॅपमध्ये करण्यात आली आहे. ग्राहकाने आपल्या मोबाईल क्रमांकावरून एकदा या अॅपवर नोंदणी केल्यास संबंधित ग्राहकाला पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज लागणार नाही. या अॅपचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ऊर्जा सचिव मुकेशकुमार खुल्लर व महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ओक प्रकाश गुप्ता त्या वेळी उपस्थित होते. नव्या अॅपमुळे ग्राहकांना चांगली सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास महावितरण कंपनीकडून व्यक्त होत आहे. या अॅपबरोबरच नेटबँकिंग व मोबाईल एसएमएसद्वारे वीजबिल भरण्याची यापूर्वी देण्यात आलेली सुविधाही सुरू राहणार आहे.
वीजबिल भरा मोबाईल अॅपवर
मोबाईल अॅपच्या वापरातून ग्राहकांना आता मोबाईलच्या माध्यमातून आपले वीजबिल पाहता येणार असून, त्याचा भरणाही करता येणार आहे.
First published on: 29-08-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay mseb bill using mobile ap