पुणे : करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई आणि ठाण्यासह दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा करोना कृती दलाची पुनर्रचना केली आहे. सावंत यांनी शनिवारी बैठक घेऊन कृती दलाच्या सदस्यांशी संवाद साधला. आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, करोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा
करोनाच्या दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवावी. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सराव प्रात्यक्षिकात (मॉकड्रील) आढळून आलेल्या त्रुटींचे तात्काळ निराकरण करावे. करोना रुग्णांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असे यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन कृती दलाच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. करोना चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत किंवा कसे याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या.
हेही वाचा – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक केंद्रे जाहीर
सौम्य स्वरुपाची लक्षणे
सध्या आढळून येणाऱ्या करोना रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत आहेत. सध्या वाढत असलेला संसर्ग १५ मे पासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले. मुखपट्टीचा वापर करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. जत्रा, व्यापारी संकुले, चित्रपटगृहे, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.