लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: उद्घाटनाअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, सायन्स पार्क मधील तारांगण प्रकल्प तातडीने खुला करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमने (पीसीसीएफने) महापालिका प्रशासनाकडे केली. पीसीसीएफचे सूर्यकांत मुथियान, राजीव भावसार आणि हृषीकेश तपशाळकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यानंतर तत्काळ नागरिकांसाठी खुले केले पाहिजेत. प्रत्यक्षात आज तसे कुठेही होताना दिसत नाही. केवळ राजकीय पक्ष आणि नेते यांच्या श्रेयवादाच्या लढाईत शेकडो कोटींचे प्रकल्प आजही धूळ खात पडून आहेत. ग. दि. माडगूळकर नाट्यगृह शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे आहे. गेली सात-आठ वर्षे त्याचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी सुमारे सात कोटी खर्च झाला. काम पूर्ण होऊन हे नाट्यगृह केवळ उद्घाटनाअभावी धूळ खात पडून आहे. नाट्यगृह सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रसिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तातडीने हे नाट्यगृह खुले करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा… पिंपरी: पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटर चालकांवर गुन्हे
उद्घाटनासाठी मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने तारांगण जनतेसाठी खुले केले नाही. शालेय विद्यार्थ्यांना सुटी सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे, तर राज्यातून शालेय विद्यार्थी तारांगण पाहण्यासाठी येतात. पण, तारांगण बंद असल्याने विद्यार्थी निराश होऊन जातात. प्रशासनाने तारांगण त्वरित खुले न केल्यास शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.